केंद्रीय पाहणी समितीत स्थान नाही यावरून राणेंनी आपली पात्रता ओळखावी..

2

वैभव नाईक ; नुकसानग्रस्तांना मदत न करता केवळ दिखावूपणासाठी समितीचा दौरा…

कणकवली, ता.०७ : तौक्‍ते वादळानंतरच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्‍बल २२ दिवसानंतर केंद्रीय समिती सिंधुदुर्गात आली. मात्र या समितीमध्ये राणेंसह इतर भाजप नेत्‍यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्‍यावरून त्‍यांनी आपली पक्षातील पात्रता ओळखावी अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी आज केली. तर केंद्राचा पाहणी दौरा हा केवळ दिखावूपणासाठी आहे. एक रूपयाचीही मदत केंद्राने नुकसानग्रस्तांना केलेली नाही. केवळ गुजरात राज्‍यासाठी १ हजार कोटींची मदत देण्यात आली असल्‍याचेही ते म्‍हणाले.
श्री.नाईक म्‍हणाले, केंद्रीय समितीने केवळ कोकणी जनतेच्या जखेमवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तौक्‍ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदींनी तातडीने गुजरात दौरा केला. तेथील नुकसानग्रस्तांना एक हजार कोटींची मदत देखील जाहीर केली. या उलट वादळ झाल्‍यानंतर २२ दिवसांनी केंद्रीय समिती सिंधुदुर्गात दाखल झाली. या समितीने देखील नुकसानग्रस्तांची पाहणीच केली नाही. केवळ पाहणीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ही समिती इथे आली असण्याची शक्‍यता आहे.
ते म्‍हणाले, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्यांना मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच असते. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत दुजाभाव करत आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी साठी राज्य सरकारने नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून यासाठी आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्याची कार्यवाही पूर्णत्वास नेली जात असून दोन दिवसांनी प्रत्यक्षात नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. याबद्दल केंद्रीय समितीने राज्य सरकारचे कौतुक करणे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय समितीने जिल्हा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले विरोधी पक्षनेते व जिल्ह्यातील भाजपचे खासदार यांनी आपले वजन वापरून राज्याला केंद्राकडून मदत मिळवून देणे अपेक्षित आहे. मात्र केंद्रीय समितीने तब्बल २२ दिवसांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन केवळ पाहणीच केली त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे खासदार नारायण राणे व स्वयंघोषित भाजप नेते यांचे केंद्रात किती वजन आहे, हे यानिमित्ताने आपल्याला दिसून आले असे श्री.नाईक म्‍हणाले.

0

4