वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयासमोर भाजपाने छेडले “लक्षवेध अभियान” आंदोलन…

2

जोरदार घोषणाबाजी;आघाडी सरकारचा केला निषेध…

वेंगुर्ले ता.१६: कोरोना संक्रमण रोखण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज येथील ग्रामीण रुग्णालयासमोर भाजपाच्या वतीने “लक्षवेध अभियान आंदोलन” करण्यात आले.एक- दो, एक- दो.. पालकमंत्री फेक दो.., जिल्हा आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर नेणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध असो..!,अशा घोषणा देत भाजपा पदाधिकाऱ्यांनी वेंगुर्ला आंदोलन स्थळ दणाणून सोडले.
या आंदोलनामध्ये भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सुषमा खानोलकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, दादा केळुसकर, बाबली वायंगणकर, शरद मेस्त्री, स्मिता दामले, बाळू प्रभू, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, सुरेंद्र चव्हाण, प्रशांत खानोलकर, प्रणव वायंगणकर, वृंदा मोरडेकर, प्रणव वायंगणकर, शेखर काणेकर, स्मिता कोयंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना प्रसन्ना देसाई यांनी आरोग्य व्यवस्था बिघडण्यात आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. वेंगुर्ले येथे कोट्यावधी रुपये खर्च करून हॉस्पिटलची इमारत उभी केली. या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र सध्या आवश्यकता असतानाही या इमारतीचा वापर रुग्णांसाठी होत नाही हे दुर्दैव आहे.
वेंगुर्ले तालुक्यात आजही एकाही शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर ची सोय नाही, आरवली येथे मंजूर झालेले कोवीड केअर सेंटर सुरू होऊ शकले नाही. याला आमदार दीपक केसरकर जबाबदार आहेत. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर ठेवून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो असे त्यांनी सांगितले. तर महिला तालुकाध्यक्ष सुषमा खानोलकर यांनीही राज्यसरकार सह पालकमंत्री, आमदार यांचा वेंगुर्ले सह जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष नसल्याने आज अनेकांना कोरोनाच्या महामारीत जीव गमवावा लागला. यास हे सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

0

4