म्हणून….मी राजकीय पक्षांना नकोसा झालोय…

2

सुधीर सावंत; केंद्रीय मंत्र्यांना राज्यात कोण विचारत नसल्याची टीका…

सावंतवाडी ता.३१: मी आजही राजकारणात तितकाच सक्रिय आहे. परंतु माझे बोलणे थेट असल्यामुळे मी राजकीय पक्षांना नकोसा झालो, अशी खंत माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली. दरम्यान केंद्रीय मंत्र्यांना राज्यात कोण विचारत नाही, त्यांना या ठिकाणी फारशी किंमत नसते, हे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून दिसून आले आहे. अशीही टीका त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता केली. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सैनिक फेडरेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तातोबा गवस, पश्चिम महाराष्ट्र संघटक विजय पाटील, पी.टी परब, समीर खानोलकर, दीपक शिर्के, रुपेश आईर, दिगंबर नाईक आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आत्तापर्यंत कुठलेच सरकार यशस्वी झालेले नाही. देशाचा पैसा अदानी अंबानी आणि दाऊद इब्राहिम यांच्या खिशात गेला. याकडे कुठच्याच सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिला नसल्याने आज अदानी अंबानी पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये आहेत.असा आरोप त्यांनी केला. दरम्यान आपण केंद्रीय राजकारणामध्ये असताना प्रत्येक गोष्टीत देशाचं हित पाहिल होत. देशाच्या हितासाठी आपण काम केले. मात्र माझा कोकणी स्वभाव कोणाला चालत नसल्यामुळे आपण आज कुठल्याच पक्षांमध्ये नाही आहे. परंतु राजकारणामध्ये आपण आजही सक्रिय आहे. सैन्यातला रिटायर झाल्यानंतर काँग्रेसने आपल्याला खासदारकी दिली. त्यावेळी आपल्याला केंद्रीय मंत्री पद काँग्रेसकडून दिले जात होते. परंतु आपणच त्यावेळी नकार दिला, मात्र आलेली संधी घालवल्यानंतर पुढे आपण कधीच केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही. आतापर्यंत कुठलंच सरकार देशाची आर्थिक विषमता दूर करण्यासाठी यशस्वी झाले नाही, देशाचा पैसा अदानी अंबानी आणि दाऊद इब्राहिम सारख्या लोकांच्या खिशात चालला आहे. याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने कोरोना सारख्या महाभयंकर काळातही अदानी अंबानी श्रीमंत होत चालले आहेत. या सर्वाचा विचार देशाच्या जनतेने करणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

459

4