बिबट्याच्या कातडीची तस्करी, सावंतवाडीत पाच जण अटक…

2

एलसीबीची कारवाई; कातडे व कारसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी, ता.१६: बिबट्याच्या कातडयाची तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडीतील तिघांना तर देवगड येथील दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई आज दुपारी मळगाव घाटात करण्यात आली त्यांच्याकडून साडेतीन लाखांच्या कातड्यासह कार जप्त करण्यात आली आहे. नितीन सूर्यवंशी रा. माजगाव, किरण सावंत चराठा, दिनेश गुरव, समीर गुरव दोघे रा. पेंढरी देवगड, व्यंकटेश राऊळ सावंतवाडी अशी त्या पाच जणांची नावे आहेत.

देवगड मधून हे कातडे सावंतवाडीत आणले जात होते याबाबतची माहीती स्थानिक अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. झाराप पत्रादेवी बायपास वरून मळगाव घाट मार्गे सावंतवाडीत येत असताना स्थानिक गुन्हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्वालीस गाडीतील तस्करांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून बिबट्याचे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे कातडे हस्तगत केले. ताब्यात घेण्यात आलेल्या पाच ही जणांना वन अधिका-यांच्या ताब्यात देण्यात आले. उद्या त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

1,656

4