ठप्प दूरध्वनी सेवेबाबत नागरिकांची बीएसएनएलवर धडक…

2

सेवा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू : यतीन खोत यांचा इशारा

मालवण, ता. १६ : ग्रामीण रुग्णालयात परिसरातील खोदकामामुळे बीएसएनएलची केबल तुटल्याने चिवला बीच, मेढा परिसरातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली आहे. याबाबतची तक्रार देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने नगरसेवक यतीन खोत, मोहन वराडकर यांच्यासह नागरिकांनी बीएसएनएलच्या कार्यावर धडक देत अधिकार्‍यांना धारेवर धरले.
अखेर उद्या सायंकाळपर्यंत दूरध्वनी सेवा पूर्ववत करण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले.
ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात सुरू असलेल्या खोदकामामुळे बीएसएनएलची केबल तुटली आहे. यामुळे गेले पाच दिवस चिवला बीच, मेढा परिसरातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली. परिणामी याचा फटका येथील पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. दूरध्वनी सेवा सुरळीत व्हावी यासाठी नागरिकांनी बीएसएनएलच्या कार्यालयात तक्रार दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने नगरसेवक यतीन खोत, मोहन वराडकर यांच्यासह विलास मुणगेकर, रुजाय फर्नांडिस, महेश मयेकर, संतोष परब, उदय परब, प्रसन्न मयेकर, कमलेश मयेकर, सागर जाधव, कुणाल खानोलकर, राजा वालावलकर यासह अन्य नागरिकांनी येथील बीएसएनएलच्या कार्यालयावर धडक दिली.
यावेळी बीएसएनएलच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. नागरिकांनी तक्रार देऊनही त्यावरील कार्यवाही का झाली नाही अशी विचारणा अधिकार्‍यांना करण्यात आली. दूरध्वनी सेवा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू. यावेळी नागरिकांशी उद्धट वागणार्‍या अधिकार्‍यालाही फैलावर घेण्यात आले. नागरिकांशी सौजन्याने वागा अन्यथा खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा श्री. खोत यांनी यावेळी दिला. अखेर उद्या सायंकाळपर्यंत दूरध्वनी सेवा सुरळीत करण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले.

4