कोळंब पुलाची दुरुस्ती न होण्यासाठी स्वाभिमान कडुनच ‘खो’

2

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची प्रसिद्धीपत्रकातून टीका…

 

मालवण, ता. १६ : कोळंब पुलाची दुरुस्ती होऊ नये यासाठी स्वाभीमान पक्षाकडून अनेक वेळा अडचणी आणण्यात आल्या. त्यामुळेच पुलाच्या दुरुस्तीस विलंब झाला. अन्यथा या पुलाची दुरुस्ती ६ महिन्यात पूर्ण झाली असती. या सर्व अडचणीवर मात करत कोळंब पुलाचे काम पूर्ण केले जात आहे. मात्र कोळंब पूल होऊ नये यासाठी स्वाभिमान पक्षाने पुन्हा हात पाय हलवायला सुरवात केली आहे. आता पर्यावरण विभागाकडे तक्रार करण्याच्या स्वाभिमानच्या भूमिकेमुळे गेले वर्षभर पुलास अडथळा आणण्याची त्यांची भूमिका उघड झाली आहे अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकातून केली आहे.
मालवण देवगड मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या कोळंब पुलाच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला आहे. हे स्वाभिमान पक्षाच्या मंदार केणींनी मान्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केणी यांचे मी आभार मानतो.
कोळंब पुलावरून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतुकीमुळे व पुलाची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे हे पूल वाहतुकीस धोकादायक बनले होते. दोन वर्षांपूर्वी पुलाच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केलेल्या तांत्रिक चाचणीत पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने अधिक निधीची आवश्यकता होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन अंदाजपत्रक सादर केले. आमदार श्री. नाईक यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून पुलासाठी आवश्यक निधी मंजूर करून आणला. श्री. नाईक यांच्या प्रयत्नांमुळे कोळंब पुलाच्या दुरुस्तीसाठी सर्वांत जास्त निधी दिला असून पुलाचे काम दर्जेदार पद्धतीनेच सुरू आहे. पुलाचे काम निकृष्ट झाल्याचे आढळल्यास अधिकार्‍यांनी कारवाई करावी आम्ही त्यांच्या सोबत राहू. मात्र पुलावरील वाहतुकीला कोणी अडथळा आणू नये. कोळंब पूल होत असल्याने स्वाभिमान पक्षाच्या मंडळींमध्ये धुसफूस सुरू आहे. हे पूल न होण्यासाठी ते प्रयत्न करत असून अडचणी निर्माण करत आहेत. मात्र मालवणवासीय आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे त्यांनी ध्यानात घ्यावे. धोकादायक झालेले कोळंब सारखे पूल दुरुस्त करणे त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणणे हे सोपे काम नाही असा टोलाही श्री. खोबरेकर यांनी लगावला.
आमदार नाईक यांनी शब्द दिल्याप्रमाणे कणकवली-आचरा, कसाल-मालवण, आचरा -मालवण, वेंगुर्ले-मालवण, कुडाळ-मालवण हे मालवण तालुक्याला जोडणारे रस्ते देखील त्यांनी पूर्णत्वास नेले आहेत. त्यामुळे आमदारांवर टीका करून स्वाभिमान पक्ष फक्त लोकांची दिशाभूल करण्याचा एककलमी कार्यक्रम करत असल्याची टीकाही श्री. खोबरेकर यांनी केली.

8

4