सुनंदा धर्णे; शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेत आवाहन…
दोडामार्ग, ता.१६: शेतकर्यांनी येणार्या काळात आधुुनिक शेतीकडे लक्ष दिल्यास तो त्यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरेल असे प्रतिपादन दोडामार्गच्या पंचायत समिती सदस्य सुनंदा धर्णे यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले.पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रशिक्षक बाळासाहेब गाढवे,महेश आगम, मंडळ समन्वयक दिप्ती नाईक,हर्षदा देसाई,प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी विनीता देसाई, गीता गवस, सुनील आरोसकर आदी उपस्थित होते.
यावेळी सौ. धर्णे म्हणाल्या, शेतकर्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी गटशेतीशिवाय पर्याय नाही.त्यामुळे शेतकर्यांनी गटशेतीकडे वळायला हवे.येणार्या काळात शेतकर्यांसाठी सुवर्णयुग असणार आहे.त्यामुळे पारंपारिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळल्यास त्याचा फायदा निश्चितच होईल.या प्रशिक्षण कार्यशाळेला साटेली भेडशी, कोनाळ, तेरवण-मेढे, पाळये, घोडगे, परमे आदी भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.