मालवण शहरातील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे : भाऊ सामंत

239
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १७ : मालवण शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे सध्या सुरू असलेले काम अभियंत्यांच्या देखरेखीखाली होत नसून ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत यांनी केला आहे. काल मध्यरात्री सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी, सुपरवायझर नसल्याने स्थानिक नागरिकांनी हे काम रोखले.
कसाल-मालवण या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. गेले चार दिवस शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र मध्यरात्री केल्या जाणार्‍या या कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी, सुपरवायझर उपस्थित नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या डांबरीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील रस्त्याचे झालेले डांबरीकरण पाहता पावसाळ्यात हा रस्ता उखडून जाण्याची तसेच पावसाच्या पाण्यामुळे पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे.
कसाल-मालवण रस्त्याच्या डांबरीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र सध्या ज्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. त्यात बर्‍याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडले असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. शहरातील बसस्थानक परिसरात झालेले डांबरीकरण चुकीच्या पद्धतीने झाले असून पावसाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणले आहे. शहरात गेले चार दिवस रात्रीच्यावेळीस डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम योग्य दर्जानुसार होत आहे की नाही हे पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे डांबरीकरण येत्या पावसाळ्यात टिकेल का? असा प्रश्‍न श्री. सामंत यांनी उपस्थित केला आहे.

\