काका कुडाळकर : महसूलमंत्र्यांच्या दौर्याचे फलीत काय?
कणकवली, ता.17 : हायवेच्या प्रकल्पग्रस्तांसमवेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्गात दोन वेळा बैठका घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी पातळीवर देखील बैठका झाल्या. पण हायवेचा एकही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे महसूलमंत्री, जिल्हाधिकारी यांनी बैठका कशासाठी घेतल्या. त्यांच्या दौर्याचे आणि बैठकांचे फलीत काय? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी काका कुडाळकर यांनी आज उपस्थित केला.
येथील काँग्रेस कार्यालयात श्री.कुडाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत, उपाध्यक्ष संजय राणे, राजेंद्र पेडणेकर, सेक्रेटरी प्रवीण वरूणकर, महेश तेली आदी उपस्थित होते.
श्री.कुडाळकर म्हणाले, गेल्या चार साडे वर्षात राज्य तथा केंद्र सरकारला हायवेचा एकही प्रश्न सोडवता आलेला नाही. महसूल मंत्र्यांची तर दिशाभूल करण्यासाठी सिंधुदुर्ग दौरे केले. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेची नेतेमंडळी आंदोलने करून जनतेची फसवणूक करीत आहेत. तुम्ही सत्तेत असताना मंत्र्यांशी भेटून हायवेचे प्रश्न का सोडवत नाहीत असाही प्रश्न काका कुडाळकर यांनी व्यक्त केला.
हायवे खड्डेमुक्त असेल अशी ग्वाही गेल्या पावसाळ्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर खड्डेमय महामार्गाची समस्या कायम राहिली. त्यात आता धूळ, वाहतूक कोंडी, अरुंद सर्व्हिस रोड, डायर्व्हशन अशा अनेक अडथळ्यांची मालिका उभी राहिलीय. याबाबतचा उद्रेक कणकवलीत झाला. कणकवलीकरांच्या या लढ्याला काँग्रेसचा सदैव पाठिंबाच असेल अशीही ग्वाही श्री.कुडाळकर यांनी दिली.