रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गतच ठेवा…

2

मत्स्य आयुक्तांना मच्छीमारांकडून निवेदन सादर…

 

मालवण, ता. १७ : कोकण कृषी विद्यापीठ मत्स्य शिक्षणासाठी मच्छीमारांना ७० टक्के जागा देते. मात्र नागपुरचे विद्यापीठ असे आरक्षण देत नाही. मच्छीमार समाजातील लोक शिक्षणात प्रगती साधत आहेत. त्यामुळे मच्छीमारांच्या प्रगतीच्या काळात शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचे नियंत्रण नागपूरसारख्या दुर अंतरावरच्या विद्यापीठाकडे दिल्यास मच्छीमारांच्या विकासावर अनिष्ठ परिणाम होणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गतच ठेवावे अशा आशयाचे निवेदन मालवणातील मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदिप वस्त यांना आज दिले.
जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, जॉन नर्‍होना, गंगाराम आडकर, सुनिल खांदारे, विकी चोपडेकर, रमेश मेस्त, दिलीप घारे, बंटी रेवंडकर, सेलेस्तीन फर्नांडीस यांच्या शिष्टमंडळाने श्री. वस्त यांची भेट घेत निवेदन सादर केले. मत्स्य व्यवसाय विकासात महाविद्यालयाचा महत्त्वाचा वाटा राज्यातील ७५ टक्के मत्स्यव्यवसाय कोकणात आहे. संपूर्ण देशाला कोकण सुकविलेले, खारवलेले, ताजे मासे पुरवितो. महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाच्या विकासामध्ये कोकण कृषी विद्यापीठातील शिरगाव, रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कायदेविषयक त्रुटीमुळे रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय आणि संशोधन संस्था नागपुरस्थित विद्यापीठाला संलग्न करण्याचे विचार शासन दरबारी सुरू असल्याचे समजते. त्याला सर्व मच्छीमारांचा विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सन २००८ मध्ये पदुम मंत्र्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना शासनाची भूमिका स्पष्ट केली होती. सन २००० व २००८ मध्ये विधान सभेतील चर्चेनंतर कायद्यातील त्रुटीच्या आधारावर मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी माफसू अधिपत्याखाली स्थलांतरीत करण्याचे उपद्व्याप माफसूकडून करण्यात येतात. त्यामुळे माफसू कायद्यात सुधारणा कराव्यात. कोकण कृषी विद्यापीठाने सन २००० ते २०१९ पर्यंत दिलेल्या मत्स्यव्यवसाय पदव्या पूर्वलक्षी प्रभावाने वटहुकुमाद्वारे कायदेशीर करण्यात याव्यात व कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यव्यवसाय विषयात पदवी देण्याचे अधिकार द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.

4