आमदारांनी निकृष्ट कामाच्या चौकशीचे आदेश देण्याची धमक दाखवावी…
मालवण, ता. १७ : कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम व्हावे यासाठी आम्ही संघर्ष समितीसोबत प्रयत्न केले. पुलाचे काम थांबविण्यासाठी स्वाभीमानने कधीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे स्वाभिमानवर खोटे आरोप करण्यापूर्वी हरी खोबरेकर यांनी याचे पुरावे द्यावेत असे आव्हान स्वाभीमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.
कोळंब पुलाच्या दुरुस्तीच्या विषयावरून स्वाभीमान-शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. श्री. खोबरेकर यांनी केलेल्या आरोपांना श्री. केणी यांनी पत्रकातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोळंब पुलाचे काम रोखण्यासाठी नव्हे तर ते लवकरात लवकर व्हावे यासाठी स्वाभीमान पक्षाने संघर्ष समितीसोबत प्रयत्न केले. त्यामुळे स्वाभीमानने हे काम रोखण्यासाठी प्रयत्न केले असे श्री. खोबरेकर म्हणत असतील तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत असे आव्हान दिले. तुमच्या गॉगल गँगसारखे भराव टाकणार्याकडे पैसे मागायला आम्ही गेलो नाही असा टोलाही श्री. केणी यांनी लगावला. पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यापूर्वी पर्यायी रस्ता देण्याची प्रशासन व आमदारांची जबाबदारी होती. यात त्यांनी कातवड रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात हे काम न झाल्याने ग्रामस्थांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला. याउलट राणेंनी खैदा येथील रस्त्याच्या कामास निधी उपलब्ध करून दिला. हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्याच्या तीन तारखा आमदारांनी दिल्या. मात्र अद्याप त्याची कार्यवाही झाली नाही. या पुलाचे काम साडे तीन कोटीवरून आठ कोटीचे झाले. यात साटेलोटे असल्यानेच आमदार या निकृष्ट कामाबाबत समाधानी असल्याची टीका श्री. केणी यांनी केली.
पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची मुदत १५ मे होती. मात्र त्यानंतर आता २५ तारखेपर्यंतची मुदतवाढ घेण्यात आली आहे. पैसे खाऊन जबाबदारी अधिकार्यांवर ढकलणे ही शिवसेनेची जुनी स्टाईल असल्याचा आरोप श्री. केणी यांनी केला. पुलाच्या कामात दर्जा दिसत नसल्याचे इंजिनिअर, ग्रामस्थांनी स्वाभीमान पक्षाकडे तक्रार केल्या होत्या. पुलाच्या कामासाठी खारे पाणी वापरत असताना ग्रामस्थांनी ठेकेदाराला पकडले होते. या पुलाच्या दुरुस्तीचे काम हे निकृष्ट दर्जाचेच असल्याने आमदारांनी सत्ताधारी म्हणून या पुलाच्या चौकशीचे आदेश देण्याची धमक दाखवावी असे आव्हानही श्री. केणी यांनी पत्रकातून दिले आहे.