अशोक तोडणकर यांचा पर्ससीनधारक ट्रॉलर्स संघटनेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा…

143
2

यापुढे पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्यात सक्रिय राहणार ;तोडणकर यांचे स्पष्टीकरण…

मालवण,ता. १८: पर्ससीनधारक ट्रॉलर्स मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून गेली आठ वर्षे काम पाहत आहे.मात्र आमच्यातील काही सदस्यांनी पर्ससीन एलईडीद्वारे मासेमारी करण्यास सुरवात केल्याने जिल्ह्याच्या समुद्रातील मत्स्योत्पादन घटले आहे.बेछूट मासेमारीमुळे भविष्यात मत्स्यबीज नामशेष होण्याची दाट शक्यता आहे.पारंपरिक मच्छीमारांचे झालेले हाल पाहता मीच माझ्या घराला आग लावतोय की काय? अशी भावना निर्माण झाल्यानेच मी या संघटनेच्या अध्यक्षपदाचा आज राजीनामा देत आहे.भविष्यात पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठीच काम करत त्यांच्या लढ्यात सक्रीय राहणार असल्याचे माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी श्री. तोडणकर म्हणाले, पर्ससीन नेटची मासेमारी करण्यास सुरवात झाल्यानंतर शासनाने त्यावर निर्बंध घातले. त्यामुळे बारा नॉटीकलच्या बाहेर मासेमारी करणे, पर्ससीनची मासळी येथील बाजारात न आणणे यासारखी बंधने आम्ही स्वतःवर घालून घेतली. दोन्ही प्रकारचे मच्छीमार जगले पाहिजे अशी आमची भूमिका होती. मात्र यात आमच्या काही लोकांनी हे निर्बंध पाळले नाहीत. पर्ससीननेटबरोबर त्यांनी एलईडीची विध्वंसकारी मासेमारी सुरू केली. हे आपल्याला योग्य वाटले नाही. त्यामुळे सुरवातीस माझा ट्रॉलर विकला. सध्या जिल्ह्यातील मच्छीमारांना चिंगुळ, लेप यासारखी मासळी तर रापणकर मच्छीमारांना मासळीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रापण संघ, गिलनेट हे व्यवसाय बंद पडत चालले आहेत. पारंपरिक मच्छीमार हा माझाच आहे. त्यामुळे माझ्या घराला मीच आग लावतोय की काय? अशी भावना निर्माण झाल्यानेच मी या संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
एलईडीच्या बेछूट मासेमारीमुळे मत्स्योत्पादन घटले आहे. काही ठराविक लोकच यात मोठे होत असून पारंपरिक मच्छीमारांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्याचे त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही. संघटनेतील अनेक सदस्यांनी आपला केवळ वापर करून घेतला. पारंपरिक मच्छीमारांच्या तोंडातील घास हे एलईडी पर्ससीनधारक, परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सधारक हिरावून नेत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास मच्छीमारांची पुढील पिढी बरबाद होईल. एलईडीच्या जीवघेणी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसायच धोक्यात आला आहे. त्यामुळेच मी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्यात सक्रिय होणार आहे. भविष्यात पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठीच काम करणार आहे. हा राजीनामा देण्यास आपल्यावर कोणाचाही दबाव, बंधन नसल्याचेही श्री. तोडणकर यांनी सांगितले.
येत्या २१ रोजी दांडी येथे सकल मच्छीमार मेळावा होत आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या आवाहनानुसार दांडीतील झालझुल मैदानावर खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. या मेळाव्यातून सकल मच्छीमार समाज हायस्पीड, एलईडी पर्ससीन आणि परराज्यातील मच्छीमारांच्या विरोधात संघर्षाची हाक देणार असल्याचे श्री. तोडणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

4