स्वाभिमान पक्ष पर्ससीनच्याच बाजूने ; पुरावे सादर करत हरी खोबरेकर यांनी केला पोलखोल…

2

मालवण, ता. १९ : स्वाभिमान पक्ष हा पर्ससीनच्या बाजूने असून लोकसभा निवणुकीत त्यांनी आचरा येथील मुझफ्फर मुजावर या एलईडी पर्ससीनधारकाचा स्वाभीमान पक्षात प्रवेश घेत नियुक्ती पत्र दिले. याचे पुरावेच सादर करत शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पोलखोल केला. स्वाभीमानची भूमिका काय आहे. मतांचे राजकारण कोण करतेय हे यावरून स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना व पारंपरिक मच्छीमार यांचे अभेद्य नाते आहे. त्यामुळे स्वाभीमानच्या या लोभ दाखविण्याच्या प्रकारांना मच्छीमार बळी पडणार नाही असेही श्री. खोबरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, अक्षय रेवंडकर, धीरज केळुसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पर्ससीनविरोधातील पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्याला एकमुखी पाठिंबा हा शिवसेनेने दिला आहे. पारंपरिक मच्छीमारांसोबत शिवसेना राहिल्याने विरोधकांकडून टीका झाली. मात्र आता स्वाभीमानला शिवसेनेची भूमिका पटू लागली आहे. त्यामुळे या व्होटबँकेला आपल्याकडे खेचण्यासाठी स्वाभीमान प्रयत्न करत आहे. गेल्या पाच वर्षात सोमवंशी समितीचा अहवाल स्वीकारत शासनाने पर्ससीननेटच्या मासेमारीवर निर्बंध घातले. आता एलईडी भस्मासूर वाढला आहे. याबाबत कडक कायदा करणे आवश्यक असून याची कार्यवाही येत्या अधिवेशनात केली जाणार आहे असे श्री. खोबरेकर यांनी सांगितले.
आम्ही आता पारंपरिक मच्छीमारांसोबत राहणार आहोत असे सांगणार्‍या स्वाभीमानच्या भूमिकेचा श्री. खोबरेकर यांनी पोलखोल केला. लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्या एलईडी पर्ससीनधारकावर दोन वेळा कारवाई झाली अशा आचर्‍यातील मुझफ्फर मुजावर याचा स्वाभीमानमध्ये प्रवेश घेत त्याची नियुक्ती करण्यात आली. हा प्रवेश स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, अशोक सावंत, मंदार केणी, यतीन खोत यांच्यासह स्वाभीमानच्या अन्य पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झाल्याचे छायाचित्र त्याला दिलेले नियुक्तीपत्र आणि त्याच्यावर कारवाई झाल्याची माहिती अधिकारात घेतलेली माहितीच सादर केली. यावरून स्वाभीमानची भूमिका काय आहे हे मच्छीमारांनी ध्यानात घ्यावे.
दांडी येथे वर्षभरापूर्वी झालेल्या मेळाव्यात स्वाभीमानच्या तालुकाध्यक्षांनी व्यासपीठावरून पर्ससीनला साथ दिल्याबद्दल जाहीर माफी मागितली होती. त्यानंतरही ते पर्ससीनधारकांसोबतच असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा जर पारंपरिक मच्छीमारांना पाठिंबा असेल तर त्यांनी निवडणुकीपुरता स्टंट न करता त्यांच्या पाठीशी कायम उभे राहून दाखवावे केवळ दिखाऊपणा करू नये. स्वाभीमानची भूमिका काय आहे हे मच्छीमारांना कळून चुकले आहे त्यामुळे त्यांना ते धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.

4