अरुणा प्रकल्पग्रस्तांचा इशारा; प्रकल्पस्थळी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण
वैभववाडी/पंकज मोरे,ता. २१ : अरुणा प्रकल्पाची घळभरणी प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून करण्यात आली आहे. याबाबत ग्रा.पं. ला कळविण्यात आलेली नाही. नेमकी कोणाच्या सांगण्यावरून घळभरणी करण्यात आली असल्याचा सवाल उपस्थित करीत अद्यापही अनेक लोकांना मोबदला मिळाला नाही. अशा अवस्थेत उर्वरित पंधरा दिवसांत स्थलांतर कसे करणार? असा सवाल करीत आम्ही कोणत्याही परिस्थितीत गाव सोडणार नाही. असा आक्रमक पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला.
अरुणा प्रकल्पाचे घळभरणीच्या पहिल्या टप्यातील काम झाले आहे.पाटबंधारे विभाग आखवणे, भोम, नागपवाडी येथील बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना घरे शिप्ट करण्याचे आवाहन करीत आहे.सोमवारी लाऊड स्पीकरवरुन तसे आवाहन प्रकल्पग्रस्तांना करण्यात येत होते.भोम येथील प्रकल्पग्रस्तांनी याला तीव्र विरोध करीत सदर वाहानाला गावातून हुसकावून लावले होते.तसेच भोम गावच्या हद्दीत असलेले उत्खननाचे काम थांबवले आहे.या पार्श्वभूमी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी, महालक्ष्मी कंपनीचे मॕनेजर किरण यांनी मंगळवारी भोम येथे येऊन प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली.या बैठकीला विलास कदम, अशोक बांद्रे, अंकुश पाटेकर, सुनंदा जाधव, वनिता जांभळे, सुनिल कदम, वामन बांद्रे, यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
हा प्रकल्प प्रधानमंञी सिंचन योजनेतील प्रकल्प आहे.हा कोणाच्या सांगण्यावरुन नाही.तर राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करीत आहोत.तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडविण्याचा प्रयत्न करुया.यावर्षी धरणात पाणी साठा होणार आहे.त्यामुळे विस्थापन करणे अपरिहार्य आहे.आता पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे.त्यामुळे स्थलांतर करावे लागणार आहे.आपण सहकार्य करावे.असे सांगितले.माञ प्रकल्पग्रस्तांनी आक्रमकपणे अनेक प्रश्नांचा भडीमार केला.
पुनर्वसन गावठाणांत अदयाप पाणी, वीज व इतर सुविधा नाहीत.तात्पुरते राहाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पञा शेड या गुरांना बांधण्यासारख्या पण नाहीत.आम्ही माणसे आहोत.मुला बाळांना, वयोवृध्दांना घेऊन या शेडमध्ये पावसाळा कसा काढायचा असा सवाल केला.अदयाप अनेक लोकांना मोबदला मिळालेला नाही.अशा अवस्थेत उर्वरित पंधरा दिवसात स्थलांतर कसे करणार? असा सवाल करीत आम्ही कोणत्याही परिस्थिती गाव सोडणार नाही.तसेच पुढे कामही करु देणार नाही.असा इशारा दिला आहे.
अरुणा प्रकल्पाची घळभरणीचे पहिल्या टप्यातील काम पाटबंधारे विभागाने पूर्ण केले आहे.माञ अदयाप आखवणे भोम नागपवाडी या गावातील जवळपास ८० टक्के घरांचे विस्थापन बाकी आहे.त्यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष वाढत आहे.त्यामुळे अरुणा खोरेत सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
गावात मंगळवारी पोलिसांच्यासोबतच दंगल नियंञण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.