मालवणात शिवसेनेकडून जल्लोष…

353
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

मालवण, ता. २३ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी एक लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळविल्यानंतर तालुक्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, पेढे वाटून एकच जल्लोष केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. स्वाभीमान पक्षाने रत्नागिरी, सिंधुदुर्गात प्रभावी प्रचारयंत्रणा राबविल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या मताधिक्क्यात वाढच होत गेली. त्यामुळे स्वाभीमानच्या गोटात सर्वत्र सन्नाटा पसरल्याचे दिसून आले. दोन्ही जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या मताधिक्क्यांत वाढ झाल्याने मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसरात गर्दी करण्यास सुरवात केली. विजय निश्चित असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. दुपारी राऊत यांचे मताधिक्य एक लाखाहून अधिक झाल्याने त्यांचा विजय निश्‍चित असल्याचे स्पष्ट होताच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील भरड भागात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पालिकेचे आरोग्य सभापती पंकज सादये, किरण वाळके, महेश देसाई, यशवंत गावकर, प्रवीण रेवंडकर, अक्षय रेवंडकर, सचिन गिरकर, माधुरी खोबरेकर, महेश शिरपुटे, धीरज केळुसकर, दत्ता पोईपकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातही विविध शिवसेना शाखा कार्यालयाच्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. महायुतीचा विजय निश्‍चित असल्याने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे.

\