वैभववाडी, ता. २३ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विनायक राऊत विजयी झाल्यानंतर तालुक्यात शिवसेना भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, एकच जल्लोष करत वैभववाडी संभाजी चौक ते दत्तमंदिर असी विजयी रॅली काढली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या मताधिक्क्यात वाढच होत गेली. त्यामुळे स्वाभीमानच्या गोटात सर्वत्र सन्नाटा पसरल्याचे दिसून आले. दोन्ही जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या मताधिक्क्यांत वाढ झाल्याने वैभववाडी तालुक्यातील शिवसेना भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांनी संभाजी चौक परिसरात गर्दी करण्यास सुरवात केली. विजय निश्चित असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. दुपारी राऊत यांचे मताधिक्य एक लाखाहून अधिक झाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट होताच शिवसेना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरात संभाजी चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला शिवसेना भाजपा महायुतीचा विजय असो,शिवसेना झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, शिवसेना उपल्हाप्रमुख नंदू शिंदे शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, विठ्ठल बंड,संभाजी रावराणे, रमेश तावडे, दिगबंर माजरेकर,सौ स्नेहलता चोरगे, सौ सीमा नानीवडेकर,किशोर दळवी,उदय जैतापकर, आदी सेना भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.