जिल्ह्यातील जनतेचा शिवसेनेवर विश्वास…; आम. वैभव नाईक

195
2
Google search engine
Google search engine

विधानसभा निवडणुकीत तिन्ही उमेदवार महायुतीचेच असतील

 

मालवण, ता. 23 : गेल्या पाच वर्षाच्या काळात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जी विकासात्मक कामे केली. यात जनता तसेच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. विरोधकांकडून शिवसेनेकडून होत असलेल्या विकासकामांवर आरोप प्रत्यारोप झाले. मच्छीमार, रास्त धान्य दुकान, वाळू, रस्ते याबाबत सर्वसामान्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम विरोधकांकडून झाले. मात्र यानंतरही जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना मोठे मताधिक्य दिल्याबद्दल सर्वप्रथम जिल्ह्यातील सर्व मतदारांचे मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी ब्रेकिंग मालवणीशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून जोमाने प्रचारयंत्रणा राबविली. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा विजय झाला आहे. निवडणूक काळात विरोधकांकडून मच्छीमारांमध्ये गैरसमज पसरविण्यात आला. मात्र तो येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दूर होईल असा मला विश्‍वास आहे. जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना खासदार विनायक राऊत यांना जिल्ह्यातून दोन वेळा सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले. शिवाय दोन विधानसभा मतदार संघात आमदार दिले. महायुतीला या निवडणुकीत मिळालेले यश पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजप युतीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.