सलग पाचव्या पराभवासाठी तयार राहावे…
कणकवली, ता.२३: राणेंची राजकीय विश्वासार्हता आता संपुष्टात आली आहे. तर जनतेनेही त्यांना झिडकारले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नीतेश राणेंचा पराभव आम्ही करणार आहोत.नारायण राणेंचा दोन वेळा पराभव झाला.तर नीलेश राणेंनाही दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.आता नीतेश राणेंनी पाचव्या पराभवासाठी तयार राहावे असे आव्हान भाजप युवा नेते संदेश पारकर यांनी आज दिले.
येथील भाजप कार्यालयात श्री.पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकसभा निवडणूक निकालातून इथल्या जनतेने कोकणी बाणा दाखवून दिला आहे. याच मतदारांच्या पाठबळावर आम्ही नीतेश राणेंचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी सज्ज झालो आहोत. युतीचा जो उमेदवार निश्चित होईल, त्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रचार करणार आहोत.रत्नागिरी-सिंधुदुर्गात कुठेही राणेंचे वातावरण नव्हतं. सलग पराभवामुळे राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत असेही श्री.पारकर म्हणाले.