खवणे येथील शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या परप्रांतीय कामगारांना चोप..

2

वेंगुर्ले, ता.१३: तालुक्यातील आकाश फिश मिल येथे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी खवणे येथील शाळकरी मुलींची छेड काढल्याने, त्या परप्रांतीय दोन कामगारांना संतप्त झालेल्या त्या पाचही मुलींनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत चपलांचा प्रसाद दिला.
केळुस सडयावर असलेल्या आकाश फिश मिल मध्ये काम करणारे ते परप्रांतीय कामगार आहेत. मंगळवार १२ ऑक्टोबरला पाट हायस्कूल मध्ये बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या खवणे येथील मुली पाट हायस्कूल सुटल्यानंतर कदंबा गाडीने केळुस धक्का येथे दुपारी १२-३० च्या दरम्यान उतरल्या व आपल्या घरी जात होत्या. त्या दरम्यान आकाश फिश मिलमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी या पाचही मुलींचा पाठलाग करून, छेड काढली. त्यामुळे मुली घाबरल्या व आपल्या खवणे गावात पोहोचल्यानंतर सर्व हकीगत आपल्या आई वडीलांसह ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर पालक व ग्रामस्थ संतप्त झाले व सर्व मुलींना आकाश फिश मिल कंपनीकडे घेऊन आले. कंपनीच्या त्या दोन परप्रांतीय असलेल्या कामगारांना ग्रामस्थ व पालकांनी कंपनीच्या गेटच्या बाहेर बोलविल्यानंतर त्या पाचही मुलीं संतप्त झाल्या व त्या दोन परप्रांतीय कामगारांना त्यांनी चपलांचा चांगलाच प्रसाद दिला. दरम्यान या दुर्घटनेमुळे त्या कामगारांना कंपनीने कमावरून काढून टाकले आहे.

265

4