मिरची पूड टाकून लुटल्याचा “तो” बनाव असल्याचे तपासात उघड….

2

वैभववाडी दरोडा प्रकरणाला कलाटणी; दोघा कर्मचा-यांसह अन्य एकाच्या शोधात पोलिस…

वैभववाडी ता.१३
अज्ञात चोरट्याने डोळ्यात मिरचीपुड टाकून आपल्याला लुटल्याचा एटीएम कर्मचाऱ्यांनी रचलेला “तो” बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी त्या दोघा संशयितांसह अन्य एकाला ताब्यात घेण्यासाठी वैभववाडी पोलीस रवाना झाले आहेत. जिवाची मजा करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांनी पैसे वापरले असल्याचे समजते. त्यामुळे नेमके पैसे त्यांनी कुठे खर्च केले ? हा सर्व प्रकार तपासात उघड होणार आहे..
सेक्युअर व्हल्यु इंडिया कंपनी लि.ही कंपनी जिल्ह्यातील बॕंकांच्या एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम सन २०१५ पासून जिल्ह्यात करीत आहे.या कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात रा.वेंगुर्ला व सगुण केरवडेकर रा.कुडाळ हे दोघजण गेली पाच सहा वर्षे कंपनीत काम करीत आहेत.
मंगळवारी कणकवली येथील बॕंक आॕफ इंडीया शाखेतुन एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी त्यांनी ३०.लाख रुपये काढले.त्यातील ७.लाख रुपये येथीलच एटीएम मशिनमध्ये भरले व उवर्रित २३ लाख रुपये घेऊन मोटारसायकलने ते वैभववाडी येथील एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी येत होते.दरम्यान तळेरे वैभववाडी महामार्गावर कोकिसरे घंगाळवाडीनजीक मागून मोटारसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोटारसायकलला लाथ मारली.यात हे दोन्हीही कर्मचारी रस्त्याच्या कडेला पडले.दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावाडर टाकून त्यांकडे असलेली २३.लाख रुपये असलेली बॕग हिसकावून घेऊन तळेरेच्या दिशेने पोबारा केला.अशी फिर्याद या कर्मचाऱ्यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत दिली होती.
भरदिवसा कायम वाहनांची वर्दळ असलेल्या महामार्गावर एवढी मोठी लुटमार झाल्यामुळे वैभववाडीसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या घटनेची माहीती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी डाॕ.नितीन कटेकर, स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी आपल्या पथकासह वैभववाडी दाखल झाले होते.तर राञी उशीरा जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी वैभववाडी येऊन या प्रकरणी चौकशी केली होती.
पोलिसांनी याप्रकरणात कसून चौकशी करीत होते.कणकवली ते घटनास्थळा दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले.तसेच बुधवारी यातील एका संशयीत कर्मचाऱ्यांला वेंगुर्ला येथे घेऊन जात चौकशी केली.तर सायंकाळी पुन्हा आरोपीला घटनास्थळी नेऊन वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक प्रविण देसाई, सुरज पाटील , पो.नाईक अनिकेत तावडे, मारुती साखरे यांनी उलट तपासणी केली.सुरुवातीला ताकास तूर लागू न देणाऱ्या या संशयीतांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी आपणच हा बनाव केल्याचे कबुल केले आहे.त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार या प्रकरणात आणखी एक आरोपी असून त्याच्याकडे मुद्देमाल असल्याचे तपासात पुढे आले आहे.त्यामुळे या दोन संशयीत कर्मचाऱ्यांना घेऊन पोलिस कुडाळला रवाना झाले आहेत असे समजते .याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहीती देण्यात आलेली नाही.

 

1,442

3
1
4