जिल्ह्यातील व्यापारी बांधवांची माहिती गोळा करण्यासाठी मोहीम…

2

प्रसाद पारकर ; व्यापारी महासंघाचा गुगल फॉर्म भरून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे…

मालवण, ता. १३ : जिल्ह्यातील व्यापार क्षेत्राची अद्ययावत सांख्यिकी मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुगल फॅार्मच्या माध्यमातून जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांची माहिती गोळा करण्याची धडक मोहिम जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाला जिल्ह्यातील व्यापार विश्वाच्या विविध समस्या अडचणी शासन दरबारी धसास लावताना जिल्ह्यातील व्यापार जगताची अधिकृत सांख्यिकी उपलब्ध नसल्याने अनेक मर्यादा पडतात. विशेषत: कोविड काळात विज देयक किंवा व्याज सवलती बाबत शासन दरबारी संवाद साधताना अशी निश्चित व विश्वासार्ह माहिती कुठेही उपलब्ध नसल्याने याबाबत ठोस आश्वासन सरकारकडून मिळवण्यात महासंघाला अद्याप यश मिळू शकले नाही. ही बाब ध्यानात आल्यामुळे महासंघातर्फे ही सांख्यिकी गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार क्षेत्राची खात्रीशीर माहिती उपलब्ध होण्यासाठी महासंघाने तयार केलेल्या या गुगल फॅार्मची कळ (लिंक) https://forms.gle/K4SYRFW6SyhBiK7y7 अशी आहे. सर्व प्रकारचे दुकानदार, व्यावसायीक, पर्यटनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पर्यटन व्यावसायीक, फिरते विक्रेते, मासे, भाजी, फळ विक्रेते, रिक्षा व्यावसायीक, गाड्या स्कूटर भाड्याने देणारे थोडक्यात नोकरी व्यतिरिक्त अन्य मार्गानी उत्पन्न मिळविणाऱ्या अशा सर्वानीच हा अर्ज दाखल करून महासंघास सहकार्य करावे, जेणेकरून शासनस्तरावर जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या कोणत्याही बाबी बाबत बाजू मांडताना किंवा सवलतींबाबत मागण्या करताना उपलब्ध ठोस माहितीच्या आधार मिळेल. याबाबत कोणतीही शंका किंवा माहिती हवी असल्यास महासंघांचे पदाधिकारी किंवा स्थानिक व्यापारी संघाचे अध्यक्षांशी संपर्क साधावा किंवा महासंघांचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या ९४२२०५४५८८ या क्रमांकावर मिसकॅाल द्यावा, असे आवाहन श्री. पारकर यानी केले आहे.

226

4