कुडाळ शिक्षक समितीने केलेल्या निषेधाची दखल घ्या…

2

जिल्हा पत्रकार संघ व कुडाळ समितीची अध्यक्षांसह सीईओंकडे मागणी…

सिंधुदुर्गनगरी,ता.१८: कुडाळ पंचायत समितीच्या सभेमध्ये जो ठराव लोकप्रतिनिधींनी घेतला त्यासंदर्भात वृत्तपत्रांमधून आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने कुडाळ प्राथमिक शिक्षक समितीने प्रसारमाध्यमांचा निषेध केला. हा निषेध म्हणजे वृत्तपत्रांवर दबावतंत्र वापरण्याचा शिक्षक समितीचा प्रयत्न आहे. तरी याची चौकशी होवुन यात काही तथ्य असेल तर त्या शिक्षकांवर कारवाई व्हावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार समितीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर तसेच कुडाळ सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये शिक्षकांबद्दल लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या ठरावाचे वृत्तांकन माध्यमांनी प्रसिद्ध केले. सभागृहांमध्ये झालेला ठराव हा वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्यावर प्राथमिक शिक्षक समितीच्या सभेमध्ये प्रसिध्दीमाध्यमांचा निषेध करण्यात आला. हा झालेला निषेध शिक्षक समितीच्या सोशल मीडियावरील ग्रुपवर व्हायरल करण्यात आला. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिक्षणाधिकारी तसेच कुडाळ तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई व गटशिक्षणाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देऊन पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणण्याचा शिक्षक समितीचा प्रयत्न आहेे तसेच हा एक प्रकारचा दबाव असल्याचे या निवेदनात नमुद केले आहे. तरी यामध्ये काही तथ्य असल्यास जे कोणी शिक्षक दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा कार्यवाह उमेश तोरसकर, कुडाळ तालुका समिती अध्यक्ष विजय पालकर, तालुका सचिव विलास कुडाळकर, उपाध्यक्ष रवि गावडे, गुरू दळवी, खजिनदार अजय सावंत, जिल्हा मुख्यालय अध्यक्ष संजय वालावलकर, प्रमोद म्हाडगुत, संदीप गावडे, बाळ खडपकर, बाळा राणे, निलेश तेंडुलकर, काशीराम गायकवाड, अभय परुळेकर आदी पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी गंभीर दखल घेतली असून, पत्रकारांचा निषेध करणाऱ्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करा. असे लेखी आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

232

4