सिंधुदुर्ग किल्ले दर्शन प्रवासी भाड्यात वाढ…

2

आमदार, पालकमंत्र्यांचे होडी वाहतूक संघटनेने मानले आभार…

मालवण, ता. १८ : मालवण धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला या प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रौढ नागरिकांना किल्ले दर्शनासाठी करासह १०० रुपये मोजावे लागणार आहेत तर लहान मुलांच्या तिकीटाचा दर पूर्वीप्रमाणेच स्थिर ठेवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने तिकीटांच्या दरात वाढ केल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
कोरोना काळात किल्ले दर्शन बंद होते. वाढत्या महागाईच्या काळात इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता किल्ले दर्शन प्रवासी होडी वाहतूकीच्या दरात किमान दहा रुपयांची वाढ करण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार नाईक यांनी मेरीटाईम बोर्डाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार किल्ले दर्शन प्रवासी होडी वाहतूकीच्या तिकीटांच्या दरात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी किल्ले दर्शनास जाणार्‍या प्रौढ पर्यटकांना कराबरोबरच ८० रुपये दर द्यावा लागत होता. आता तिकीटाचा दर ९० रुपये तर कर १० रुपये असे प्रौढ पर्यटकांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत. लहान मुलांचा दर ४५ रुपये व कर ५ असा ५० रुपये होता तो पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला आहे. हे दर लागू करण्यात आले असल्याची माहिती प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.
मंजूर करण्यात आलेले तिकीटाचे दर जेटीवर, सूचना फलकावर लावण्यात यावेत, प्रवाशांना वितरीत करायची तिकीटे बंदर निरीक्षक कार्यालयातून शिक्के मारून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. वितरीत केलेल्या तिकीटांचा लेखा तसेच प्रवासी चढ, उतार सांख्यिकी रजिस्टरमध्ये अद्ययावत ठेवत वेळोवेळी बंदर कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. हे दर किल्ल्यात जावून परत येण्यासाठीचे असल्याने एकाचवेळी प्रवासी कर वसूल करायचा आहे. प्रत्येक प्रवासी नौकेवर प्रवासी क्षमतेनुसार लाईफ जॅकेट, जीवरक्षक साधने, संपर्क यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यात यावी. भविष्यात प्रवासी करात सुधारणा झाल्यास सुधारीत प्रवासी कर लागू होतील. प्रवासी सुविधा व सुरक्षा या अनुषंगाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल अशा सूचनाही मेरीटाईम बोर्डाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

153

4