बीएसएनएलचे दोन महिन्यात बॅटरी बसविण्याचे आश्वासन हवेत विरले…

2

आचरा टॉवरला तातडीने बॅटरी न बसविल्यास आक्रमक पवित्रा घेऊ ; चंदन पांगे यांचा इशारा…

आचरा, ता. १८ : आचरा बीएसएनएल टॉवरला दोन महिन्यांत बॅटरी बसवून देण्याचे बीएसएनएल कडून आचरावासियांना दिलेल्या आश्वासनाची दोन महिने होवूनही पुर्तता झाली नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तातडीने बॅटरी न बसविल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा आचरा माजी सरपंच चंदन पांगे यांनी दिला आहे.
आचरा बीएसएनएल टॉवरला बॅटरी बॅकअप नसल्याने लाईट गेल्यावर नेटवर्क गायब होत आहे. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या आठ दिवसात बीएसएनएल टॉवरला बॅटरी बसवून नेटवर्कची सुविधा सुरळीत न केल्यास गावातील बीएसएनएल सिमकार्ड परत करत उपोषणाला बसण्याचा इशारा माजी सरपंच श्री. पांगे यांनी दहा ऑगस्टला बीएसएनएलला दिला होता. याबाबत बीएसएनएल अधिकाऱ्यांनी आचरा येथे श्री. पांगे याची भेट घेऊन बॅटरीसेट बीएसएनएलकडे उपलब्ध नसल्याने उपलब्ध झाल्यावर येत्या दोन महिन्यात बॅटरी बसवून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. याला दोन महिन्याचा कालावधी उलटूनही बीएसएनएल कडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा श्री. पांगे यांनी दिला आहे.

57

4