दत्ता सामंत; जिल्ह्यातील जनता स्वाभिमानच्या पाठीशी…
मालवण, ता. २५ : स्वाभिमान पक्षाची लोकसभेची पहिलीच निवडणूक असताना सिंधुदुर्गातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा विजय झाला असला तरी स्वाभिमानच्या विरोधात शिवसेना, भाजपसह अन्य तीन असे पाच पक्ष होते. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील जनता स्वाभीमानच्याच पाठीशी राहिली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही आमदार हे स्वाभीमानचेच असतील असा विश्वास स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी येथे व्यक्त केला.
दरम्यान कुडाळ विधानसभा मतदार संघात १२ हजाराचे शिवसेनेचे मताधिक्य घटविण्यात स्वाभिमानला यश मिळाले. याचे आमदार वैभव नाईक यांनी आत्मपरीक्षण करावे असा टोला श्री. सामंत यांनी लगावला.
तालुका स्वाभिमानच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक यतीन खोत, दीपक पाटकर, शहराध्यक्ष लीलाधर पराडकर, स्वाभीमान युवकचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, राजू बिडये यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे लोकसभा निवडणुकीत आमचा विरोधक हा काँग्रेस असेल असे म्हणत होते. त्यांनी स्वाभीमानवर दुर्लक्ष केले होते. मात्र या निवडणुकीत स्वाभीमाननेच त्यांना खरी लढत दिली. या निवडणुकीत शिवसेना, भाजप हे सत्तेतील पक्ष आणि अन्य तीन असे पाच पक्ष स्वाभीमानच्या विरोधात होते. जर शिवसेना स्वतंत्ररीत्या लढली असती तर आज चित्र वेगळे दिसले असते. कणकवली मतदार संघात स्वाभीमानला चांगले मताधिक्य मिळाले. २०१४ च्या निवडणुकीतील सावंतवाडी, कुडाळ विधानसभा मतदार संघातील मताधिक्य पाहता यात स्वाभीमानने आपली शक्ती पणास लावत शिवसेनेचे मताधिक्य घटविण्यात यश मिळविले. कुडाळ मतदार संघात १२ हजाराचे मताधिक्य घटल्याने याचे आमदार वैभव नाईक यांनी आत्मपरिक्षण करावे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष एकत्र आले तरी तिन्ही मतदार संघात स्वाभीमानचेच आमदार निवडून येणार असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील जनतेने स्वाभिमान पक्षाला कौल दिला आहे. जिल्ह्यातील स्वाभीमानच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संघटितरीत्या चांगले काम केले. जिल्ह्यात स्वाभीमानकडेच जनता आकर्षित होत असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन श्री. सामंत यांनी केले. लोकसभा निवडणुकीत शहरात स्वाभीमानला चांगले मताधिक्य मिळाले. ज्या प्रभागात शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत त्या प्रभागात नवखा नगरसेवक यतीन खोत यांनी चांगले काम करत शिवसेनेला चपराक दिली. नगरसेवक खोत यांच्या रूपाने स्वाभीमानला कोहिनूर हिरा मिळाला आहे असे सांगत श्री. सामंत यांनी श्री. खोत यांचे कौतुक केले.
मालवण शहरात शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही स्वाभीमान पक्षाला पाचशेहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. स्वाभीमानच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्रितरीत्या काम केल्यानेच आम्हाला सांघिक यश मिळाले. शहरवासीयांनी जो स्वाभीमानवर विश्वास दाखविला तो यापुढेही असाच कायम ठेवावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केले.