पलटी झालेला ट्रक दूर करण्यास यश, करूळ घाट वाहतुकीसाठी खुला…

2

‏गेल्या चार दिवसात तीन अपघात; वाहनधारकांसह ग्रामस्थांकडून नाराजी…

वैभववाडी,ता.१९: करूळ घाट मार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. गेल्या चार दिवसात घाटात तीन अपघात झाले आहेत. काल रात्री घाटात मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाला होता. त्यामुळे घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आज तो ट्रक बाजूला करण्यात आल्यामुळे मार्ग वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला. अपघाताचे प्रमाण वाढल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकामच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक ट्रक पलटी झाला होता. त्यामुळे घाट मार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान पोलिस निरीक्षक अतुल जाधव व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने पलटी झालेला ट्रक बाजूला करून घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
करूळ घाट खड्यांचा बादशहा झाला आहे. खड्ड्यांमुळे घाट मार्गात चार दिवसात तीन अपघात घडले आहेत. दोन अपघातातील ट्रक डोंगराकडील गटारात पलटी झाले होते. तर सोमवारी घाट मार्गात गगनबावडा पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या यु टर्न वळणावर मालवाहतूक ट्रक पलटी झाला होता. घाट मार्गाची राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ डागडुजी न केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सद्यस्थितीत जीव मुठीत घेऊन वाहनचालक या मार्गाने प्रवास करत आहेत. निसर्गरम्य करूळ घाट रस्त्याची अवस्था दयनीय झाल्यामुळे पर्यटकांमध्ये देखील तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

243

4