जनशताब्दी, मंगला व मंगलोर एक्स्प्रेसला सावंतवाडीत थांबा

6411
2
Google search engine
Google search engine

मुंबईतील बैठकित निर्णय : दादरवरून सुटणा-या काही गाड्या सीएसटीतून सोडण्यात येणार

मुंबई, ता. 26 : कोकणासाठी महत्वाच्या ठरणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेस व तुतारी एक्स्प्रेस या दोन गाड्या दादरऐवजी सीएसटी येथून सोडण्याबाबत तसेच डब्याची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांनी आज येथे दिले.
दरम्यान जनशताब्दी, मंगला व मंगलोर एक्स्प्रेस या गाड्यांना सावंतवाडीत थांब देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नव्याने सुरू होणार्‍या गाड्या कणकवली, कुडाळसोबत सावंतवाडी स्टेशनवर थांबण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक आज मुंबई येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डि. के. सावंत, भाई देऊलकर, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात जनशताब्दी, मंगला व मंगलोर एक्स्प्रेस या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देण्यासाठी तर नव्याने सुरू होणार्‍या गाड्यांना कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी यापैकी कोणत्याही एका ठिकाणावर थांबा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला. आठवड्यातून दोनवेळा सुटणारी पुणे-एर्नाकुलम (व्हाया कर्जत-पनवेल) ही गाडी नियमित सुरू करण्यात यावी, ती कल्याणमार्गे सोडण्यात यावी असे ठरले. कारवार ते पेडणे डिइएमव्हीचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तुतारी एक्स्प्रेस सावंतवाडी स्टेशनवरून सुटण्याचा वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. ती गाडी 3 ऐवजी 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सावंतवाडी रेल्वे स्थानकासह धावणार्‍या सर्व विशेष गाड्यांना वेगवेगळ्या स्थानकात थांबा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. वैभववाडी स्थानकावरील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असल्याने चांदा ते बांदा योजनेंतर्गत सावंतवाडी रेल्वेस्टेशनवर लिफ्ट बसविणे, सावंतवाडी, कणकवली व कुडाळ येथे विद्युत बगीची सोय करणे, रेल्वेस्थानकासाठी रिक्षासाठी वाहनतळ उभारणे तसेच शौचालय, लहान मुलांसाठी सुविधा व पर्यटन माहिती केंद्र उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.