शासनाने ५ जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी : मंगेश सावंत
मालवण, ता. २६ : शासनाने किल्ले प्रवासी होडी वाहतूकीसह जलक्रीडा व्यवसायांना कालपासून बंदी आदेश लागू केल्याने आज येथे आलेल्या हजारो पर्यटकांची गैरसोय झाली. किल्ला दर्शन घडविण्याची मागणी पर्यटकांकडून झाल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अखेर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने दुपारी बारा वाजल्यापासून किल्ला प्रवासी वाहतूक सुरू केली. त्यामुळे बंदर जेटी परिसरात होडी वाहतूक व जलक्रीडा व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले तर तारकर्ली, देवबाग येथील जलक्रीडा व्यवसाय सकाळपासून पूर्णतः बंद ठेवल्याने पर्यटकांना माघारी फिरण्याची वेळ आली.
दरम्यान यासंदर्भात प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी किल्ला प्रवासी होडी वाहतूकीसह जलक्रीडा पर्यटनास मेरीटाईम बोर्डाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला कोणतेही लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्यास त्यानुसार मुदतवाढ देण्याचा निर्णय होईल असे स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतुकीस शासनाने २५ मे पासून बंदी लागू केली. त्यामुळे याचा फटका आज येथे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांना बसला. सकाळपासून किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यत पर्यटकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. किल्ला दर्शनासाठी भली मोठी रांग बंदर जेटीवर लागली होती. पर्यटकांकडून किल्ला दर्शनाची मागणी होऊ लागल्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्यांसह जलक्रीडा व्यावसायिकांनी बंदर कार्यालयात जात प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन नाईक, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याकडे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. यासंदर्भात ४ एप्रिलला मेरीटाईम बोर्डाच्या मुंबईतील कार्यालयात जात मुदतवाढ देण्याचे पत्र देत पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. त्यावर प्रादेशिक बंदर अधिकार्यांनी आपल्याला मुदतवाढ देण्याबाबतचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. समुद्रातील वातावरण चांगले असतानाही बंदर विभागाकडून मुदतवाढ न दिल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेला सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनधिकृतरीत्या वाहतूक सुरू करावी लागली.
शासनाकडून मुदतवाढ मिळावी यासाठी पाठपुरावा करूनही त्याची कार्यवाही मेरीटाईम बोर्डाकडून झाली नाही. त्यामुळे आज सुटीच्या दिवशी येथे आलेल्या पर्यटकांचे हाल झाले. आज वातावरण चांगले असताना बंदर विभागाकडून मुदतवाढ देण्याबाबत कार्यवाही व्हायला हवी होती. मात्र त्याची कार्यवाही झाली नाही. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असतानाही पर्यटकांच्या सोयी सुविधांबाबत शासनाचे धोरण हे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या बंदी कायद्याचा आम्हाला आदर आहे. मात्र पर्यटन व्यावसायिक म्हणून येथे आलेल्या पर्यटकांची आम्ही गैरसोय होऊ देणार नाही. दुपारी बारावाजेपर्यत आम्ही बंदर विभागाकडून कार्यवाही होते काय? याची वाट पाहिली. मात्र ती न झाल्याने पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी किल्ला प्रवासी होडी वाहतूक सुरू केली असे सिंधुदुर्ग किल्ला होडी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी सांगितले.
गेल्या तीन चार वर्षात शासनाकडून पर्यटन व्यावसायिकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रत्यक्षात २५ मेपासून बंदीचा निर्णय हा चुकीचा आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करता पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी ५ जूनपर्यतची मुदत कायमस्वरूपी देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे बनले आहे. अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांमधून होत आहे.