शब्बीर मणियार यांची नाराजी : आंदोलनाचा इशारा
सावंतवाडी, ता. 26 : पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्या पर्यटकांना पर्यटन स्थळे, गावे आणि रस्ते आदीची वाट दाखविणार्या दिशादर्शक फलकांची वाट लागल्याचे चित्र सद्यस्थितीत जिल्ह्यात आहे.
याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख शब्बीर मणियार यांनी नाराजी व्यक्त केली असून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात येतो. आता तो निधी कुठे मुरला याची चौकशी करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबतची माहिती त्यांनी ब्रेकींग मालवणीला दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात पर्यटन स्थळावर तसेच आंबोली, मालवण व येथून गोव्याकडे जाणार्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र या पर्यटकांना स्थानिक पर्यटनस्थळे, रस्ते, गावे आदीची माहिती देणारे दिशादर्शक फलक सद्यस्थितीत गंजलेले आहे. काही ठिकाणी फलकांवर शेवाळ पकडलेले आहे तर काही फलकच गायब आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग खात्याने तात्काळ दखल घेत हे फलक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले, बांधकाम किंवा राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कार्यालयातून माहिती मिळविली असता फलक रंगविण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो असे समजते. त्यामुळे यासाठी खर्च करण्यात आलेला निधी नेमका कुठे मुरला याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, असा इशारा श्री. मणियार यांनी दिला आहे.