पुण्यातील त्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार ; बाबा मोंडकर
मालवण, ता. २७ : तोंडवळी- वायंगणी माळरानावर साकारला जाणारा आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातून माईल्ड स्टोन ठरणारा सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी स्थानिक ४० ते ४५ जमीनमालकांनी आपली समंतीपत्रे मुख्यमंत्री कार्यालय तसेच भापजच्या जिल्हा कार्यालयाकडे सादर केली आहेत. स्थानिकांची घरे, गोठे, शेती, मंदिरे अबाधित ठेवण्याबरोबरच बीच, हिस्ट्री आणि अॅग्रो टुरिझम यांचा समन्वय साधून हा प्रकल्प साकारण्यासाठी भाजपच्यावतीने प्रयत्न होणार आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान पुणे येथील पुणे सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेकडे सी-वर्ल्ड प्रकल्पाची जबाबदारी असताना त्यांनी याची पूर्तता न केल्याने या संस्थेस काळ्यात यादीत टाकण्यात यावे यासाठी भाजपचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे असेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.
मालवण तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष बबलू राऊत, धोंडी चिंदरकर, प्रमोद करलकर, विनोद भोगावकर आदी उपस्थित होते. तोंडवळी-वायंगणी माळरानावर साकारल्या जाणार्या सी-वर्ल्ड या प्रकल्पाबाबत शासन व जनता यांच्यात असलेल्या असमन्वयामुळे गेल्या दहा वर्षात हा प्रकल्प मार्गी लागू शकला नाही. सी-वर्ल्ड प्रकल्पाबरोबरच बीच, हिस्ट्री आणि अॅग्रो टुरिझम विकसित होईल यादृष्टीकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे ३०० एकर क्षेत्रात या प्रकल्पाला संमती दिली. या प्रकल्पाची जबाबदारी पुणे येथील पुणे सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेकडे दिली होती. या संस्थेत जे शास्त्रज्ञ, सल्लागार होते त्यांनी राजीनामे दिल्याने या संस्थेकडून या प्रकल्पाचे कामकाज झाले नाही. त्यामुळे या संस्थेला काळ्या यादीत टाकून त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली जाणार आहे असे मोंडकर यांनी सांगितले.
चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनाच्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे सूतोवाच केले. त्यादृष्टीने जिल्हा भाजपच्यावतीने कार्यवाहीस सुरवात केली आहे. हा प्रकल्प व्हावा अशी इच्छा असल्याने स्थानिक ४० ते ४५ जमीनमालकांनी संमतीपत्रे मुख्यमंत्री कार्यालय तसेच भाजप कार्यालयाकडे सादर केली आहे. येत्या काळात सुमारे ७० ते ८० टक्के जमीनमालक आपली संमतीपत्रे देतील असा विश्वास श्री. मोंडकर यांनी व्यक्त केला. सी-वर्ल्ड प्रकल्प हा विनाशकारी नसू स्थानिक ग्रामस्थांची घरे, शेती, गोठे, मंदिरे ही अबाधितच राखूनच हा प्रकल्प साकारला जाईल. त्यामुळे या प्रकल्पाला ज्यांचा विरोध आहे त्यांच्याकडून गावपातळीवर माहिती घेत त्यांच्यातील गैरसमज दूर केला जाईल. ज्या जमिनमालकांनी संमती दिली त्यांचीही लवकरच बैठक घेतली जाईल असे मोंडकर यांनी स्पष्ट केले.
सी-वर्ल्ड प्रकल्पामुळे तोंडवळी- वायंगणी भागास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या दृष्टिकोनातून स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी तोंडवळीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कील डेव्हलपमेंट सेंटर व्हावे अशी मागणी भाजपच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विधानसभेपूर्वी सी-वर्ल्ड प्रकल्पाचे भूमिपूजन व्हावे यासाठी जिल्हा भाजपच्यावतीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही श्री. मोंडकर यांनी यावेळी सांगितले.