उपोषण मागे: टँकर सह सर्व प्रश्न सोडविण्याचे दिले आश्वासन…
सावंतवाडी, ता.२७: विलवडे-वालावल धनगरवाडी येथे राहणार्या धनगर बांधवांचा पाणी प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माजी आमदार राजन तेली यांनी घेतली आहे.जोपर्यंत संबंधित प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही तोपर्यंत खाजगी टँकरने मी स्वतः सुरळीत पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी घेईन,असे आश्वासन श्री.तेली यांनी दिल्यानंतर येथील तहसिलदार कार्यालयासमोर धनगर बांधवांच्यावतीने छेडण्यात आलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग उपस्थित होते.विलवडे-भालावल येथील परिसरात होत असलेल्या सुरुंग स्फोटामुळे घरांना तसेच विहीरींना तडे गेले आहेत.यामुळे विहीरीच्या पाण्याची पातळी खालावून विहीरी कोरड्या पडल्या आहेत.त्यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.तर घरांची व विहिरींची झालेली नुकसान भरपाईसुद्धा शासनाकडे वेळोवेळी मागणी करून मिळत नाही आहे.या सर्व प्रश्ना संदर्भात शासनाला जाग आणण्यासाठी धनगर बांधवांच्यावतीने आज उपोषण करण्यात आले होते.दरम्यान श्री.तेली यांनी पाणी प्रश्न सोडविण्यासंदर्भात तसेच घरांची व विहीरींची नुकसान भरपाई मिळण्यासाठी मी जिल्हाधिकार्यांकडे मागणी करेन, विद्युत प्रश्नासंदर्भात येत्या २ महिन्यात नवीन ट्रांसफार्मर बसून देण्यासंदर्भात सुद्धा प्रयत्न करेन असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्काळ स्थगित करण्यात आले.
यावेळी भागू लांबर,राजू लांबर,मंगेश कोकरे,सौरभ लांबर,लक्ष्मण कोकरे सुरेश,लांबर सिद्धू लांबर,बाबू कोकरे,सगुण कोकरे,गंगाराम वरक,सावित्री लांबर,सुनिता कोकरे,जनाबाई लांबर,स्वप्नाली कोकरे आदीसह मोठ्या संख्येने धनगर बांधव या उपोषणात सहभागी झाले होते.