आमदार नीतेश राणेंची ग्वाही : मोबदला दिल्याखेरीज काम सुरू न करण्याचेही निर्देश
कणकवली, ता. 27 : शहरालगतच्या जानवली गावात तरंदळे फाटा येथे एक अंडरपास प्रस्तावित आहे. तर त्यापुढील एक किलोमिटर भागात दुसरा अंडरपास मंजूर होण्यासाठी केंद्र शासन पातळीवर पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी आज दिली. तसेच जानवली गावात ज्या खातेदारांचा मोबदला अद्याप दिलेला नाही, त्या खातेदारांच्या हद्दीत चौपदरीकरण काम करू नका असे निर्देश देखील त्यांनी हायवे अधिकारी आणि ठेकेदाराला दिले.
जानवली गावातील चौपदरीकरण बाधितांच्या समस्या आमदार नीतेश राणे यांनी आज ग्रामपंचायत सभागृहात ऐकून घेतल्या. यावेळी सरपंच आर्या राणे, उपसरपंच शिवराम राणे, महामार्ग उपअभियंता अमोल ओटवणेकर, नायब तहसीलदार आर.जे.पवार यांच्यासह कणकवलीच्या माजी पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, जिल्हा परिषद सदस्या श्रीया सावंत, रंजन राणे, संदीप सावंत, दामू सावंत यांच्यासह जानवली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जानवली गावच्या हद्दीत दोन अंडरपास, दोन शाळांच्या ठिकाणी मुलांना जा-ये करण्यासाठी पर्यायी व्यवस्था, नळयोजना पूर्ववत करणे, पूर्वीच्या हद्द निश्चितीप्रमाणेच भूसंपादन करणे, भूसंपादन नोटिसा आणि मोबदला तातडीने दिला जावा, बाधित मालमत्तांचे पूर्नमुल्यांकन व्हावे आदी मागण्या मांडल्या. तर बाधित खातेदारांना लवकरात लवकर मोबदला अदा करा असे निर्देश आमदार श्री.राणे यांनी दिले. याखेरीज दोन अंडरपाससाठी दिल्ली पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. याखेरीज ज्यांना मोबदला मिळाला नाही त्या भागातील चौपदरीकरण काम बंद ठेवा असेही निर्देश त्यांनी दिले.