अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांची वीज वितरणवर धडक…
मालवण, ता. २७ : वायरी, तारकर्ली, देवबाग परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून याबाबत आवाज उठवूनही वीज वितरणने कोणतीही कार्यवाही न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली देऊळवाडा येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकार्यांना धारेवर धरले.
दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी येथे येत आमच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी लावून धरली. त्यामुळे सायंकाळी वीज वितरणच्या कार्यालयात दाखल झालेल्या कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी पेसर बसविण्याचे काम येत्या दोन दिवसात सुरू करू. आवश्यक त्या ठिकाणी २०० केव्हीचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे प्रस्ताव तयार करत पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिले.
वायरी भुतनाथ, तारकर्ली, देवबाग येथे वीज पुरवठ्याच्या समस्ये संदर्भात वायरी, तारकर्ली, देवबाग येथील संतप्त ग्रामस्थांनी स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सहायक अभियंता मंदार सावंत यांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी छोटू सावजी, बाबू बिरमोळे, देवानंद लोकेगावकर, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, श्याम झाड, मुन्ना झाड, मिलिंद झाड, रवींद्र टेंबुलकर, जयदेव सावंत, जितेंद्र केरकर, पांडू मायनाक, कमलाकर चव्हाण, मंदार झाड, मोहन कुबल, अभय पाटकर, राजन चव्हाण यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे गेले काही दिवस विजेची कोणतीच उपकरणे चालत नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला. महिनाभरापूर्वी या समस्यांबाबत लक्ष वेधूनही वीज वितरणने या समस्या का सोडविल्या नाहीत असा जाब ग्रामस्थांनी अधिकार्यांना विचारला. महावितरणचे उपअभियंता पद रिक्त असल्यानेच या समस्या सुटत नसल्याने आमच्या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांना येथे बोलावून घ्या असे श्री. सावंत यांनी सांगितले.
सायंकाळी चार वाजता कणकवलीचे कार्यकारी अभियंता संजय गवळी हे कार्यालयात आल्यानंतर त्यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार केला. अखेर २९ तारखेपासून पेसर बसविण्याची कार्यवाही केली जाईल. गावात वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कर्मचार्यांची नियुक्ती केली जाईल असे श्री. गवळी यांनी स्पष्ट केले. वीज उपकेंद्राच्या ठिकाणी कुंभारमाठ येथून वीज वाहिनी टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी न मिळाल्याने रखडले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित विभागाकडून परवानगी मिळवून देऊ असे श्री. सावंत यांनी सांगितले. हे काम मार्गी लागल्यास उपकेंद्र सुरू होऊन वीज पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल असे श्री. गवळी यांनी सांगितले. वायरी, तारकर्ली भागासाठीचा लाईनमन हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने वीज पुरवठ्याच्या तक्रारी दूर होत नाहीत. त्यावर कारवाई करावी अशी मागणी केल्यानंतर त्या लाईनमनची वैद्यकीय तपासणी करून निलंबनाची कारवाई करू असे श्री. गवळी यांनी स्पष्ट केले.