विनायक राऊत यांना केंद्रीयमंत्रीपद मिळण्याची शक्यता

2

शिवसैनिकात आनंद : पक्ष निश्चितच दखल घेईल, कार्यकर्त्यांना विश्वास

सावंतवाडी, ता. 29 : खासदार विनायक राऊत यांना केंद्रीयमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज दुपारी 3 वाजेपर्यंत होईल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा असून त्यांना मंत्रीपद मिळाल्यास उद्या होणार्‍या शपथविधीसाठी जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
याबाबत जिल्ह्यातील एका शिवसेनेच्या बड्या पदाधिकार्‍याने दुजोरा दिला आहे. श्री. राऊत यांचे गेल्या सात वर्षाचे कामकाज आणि संघटना बांधणी लक्षात घेता त्यांच्या गळ्यात पक्षश्रेष्ठी निश्चितच मंत्रीपदाची माळ घालतील असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार विनायक राऊत हे सलग दुसर्‍यांदा सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. दोन वेळा त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा पराभव केला आहे. 2012 मध्ये श्री. राऊत हे विधान परिषदेचे आमदार म्हणून सिंधुदुर्गात आले. आपल्या काळात जिल्ह्यातील पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा नेता म्हणून त्यांनी गेल्या काही वर्षात जिल्ह्यात आपली ओळख केली. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असलेला राणेंचा एकछत्री अंमल संपुष्टात आणला. त्यामुळे शिवसेनेसाठी श्री. राऊत व केसरकर हे ताईत बनले. आज पुन्हा एकदा राऊत हे पावणे दोन लाखाच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ निश्चित पडेल असा विश्वास आहे. याबाबत शिवसेनेच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार राऊत यांच्या समवेत संजय राऊत, अरविंद सावंत आदी काही नावे केंद्रीय मंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. त्याठिकाणी विनायक राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा झाल्यास आम्ही सर्व दिल्लीत होणार्‍या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहोत असे सांगण्यात आले.

7

4