तारकर्ली, देवबागमधील बंधाऱ्याच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी करा… आम. वैभव नाईक यांची पतन अभियंत्यांशी चर्चा…

357
2

मालवण, ता. २९ : मालवण तालुक्यातील देवबाग, तारकर्लीतील समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांच्या निविदाही काढल्या त्या मंजूर करत कामांना कार्यारंभ आदेश देण्याबरोबर ही कामे पावसाळ्यापूर्वी सुरू करावीत यासाठी आमदार नाईक यांनी पतनचे मुख्य अभियंता श्री. वांढेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार श्री. वांढेकर यांनी येत्या आठ दिवसात बंधार्‍यांच्या प्रत्यक्ष कामास सुरवात करण्याचे आदेश किनारी अभियंता रूपा राऊळ-गिरासे व जिल्हा पतनचे कार्यकारी अभियंता श्री. शिंदे यांना दिले आहेत.
देवबाग येथील पूर्वीचे जुने बंधारे पूर्णपणे विस्कळित बनल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार नाईक यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे देवबाग मोबारवाडी येथील ६३ मीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी ४२ लाख ६८ हजार ३५० रुपये, देवबाग येथील भाऊ गोवेकर यांच्या घराजवळील १०८ मीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी २५ लाख ६५ हजार ५९७ रुपये तसेच इतर बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी एकूण १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व बंधार्‍यांच्या दुरुस्तीच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून त्या निविदा मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरवात व्हावी या पार्श्‍वभूमीवर आमदार नाईक यांनी पतन विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.
देवबाग, तारकर्ली येथे नवीन धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी २२५ कोटी एवढ्या निधीची बजेट प्लेट तयार करून अर्थसंकल्प तरतूदीमधून या रक्कमेची तरतूद करावी अशी मागणी आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. निधीची मंजूरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. जिल्ह्यामधील इतर ठिकाणी असणारे धूप प्रतिबंधक बंधार्‍यांच्या कामांना एमसीझेडएमए ची मान्यता मिळून सिया (एसईआयआय) समितीची मान्यताही मिळाली आहे. संबंधित धूप प्रतिबंधक बंधार्‍यांच्या कामांना लवकर सुरवात व्हावी यावरही चर्चा झाली.

4