असनिये मायनिंगला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

2

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : सात-बारावर नोंदी न घालण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी, ता. 29 : असनिये मायनिंगला आमचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे गावात मायनिंग होऊ नये तसेच सद्यस्थितीत सात-बारावर घालण्यात येणार्‍या नोंदी थांबविण्यात याव्यात अशी मागणी असनिये ग्रामस्थांच्यावतीने आज जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी तुमचे म्हणणे लेखी स्वरुपात तलाठ्यांकडे सादर करा. आवश्यक असल्यास ग्रामसभेचे ठराव घ्या, असे श्री. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावात मायनिंग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या खनिज प्रकल्पाच्या नोंदी सात-बारावर घालण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे. तसेच असनियेत होणार्‍या मायनिंग प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असून नोंदी घालण्याससुद्धा आमचा विरोध आहे असे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी संजय सावंत, एम. डी. सावंत, समिर कोलते, दिलीप सावंत, आपा सावंत, अक्षय सावंत, गजानन सावंत, दशरथ सावंत, आनंद सावंत, दत्तप्रसाद पोकळे आदी उपस्थित होते.

4