देवलीत दहा अनधिकृत रॅम्पवर प्रशासनाचा ‘हातोडा’

168
2
Google search engine
Google search engine

तीन डंपर ताब्यात : जिल्हा खनिकर्म, महसूलची संयुक्त कारवाई…

मालवण ता.२९: देवली येथे अनधिकृत उत्खनन करणाऱ्या दहा रॅम्पवर खनिकर्म विभागाने अखेर कारवाईचा ‘हातोडा’ मारत ते रॅम्प आज सकाळी जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त केले.तत्पूर्वी काल रात्री तेथून रेती वाहतूक करणारे तीन डंपर खनिकर्म विभागाने पकडून महसूलच्या ताब्यात दिले होते.दरम्यान संबंधित डंपरच्या मालकांना महसूल प्रशासनाच्यावतीने कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
देवली पट्ट्यात अनधिकृतरीत्या वाळू उपसा होत असल्याच्या सातत्याने तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्याने आज सकाळी जिल्हा खनिकर्म विभागाचे श्री. दिवेकर, मंडळ अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी डी. सी. ठाकूर यांच्या पथकाने देवली येथे अचानक छापा टाकला. यावेळी सचिन अशोक रेवंडकर यांच्या मालकीचा डंपर क्रमांक एम. एच. 07 जी- 6017, महेश दत्तात्रय शिरसाट यांच्या मालकीचा डंपर क्रमांक एम. एच. 07 एक्स- 0331, मेहबूब अली वालीकर यांच्या मालकीचा डंपर क्रमांक जीए. 02 टी-8380 हे डंपर अनधिकृत रॅम्पच्या ठिकाणी आढळून आले.
यातील मेहबूब वालीकर यांच्याकडे वाळू भरलेल्याचा पास आढळून आला तर अन्य दोन डंपरमध्ये अनधिकृत रॅम्पवरून वाळू भरली जात होती.त्यामुळे महसूल विभागाने हे तिन्ही डंपर ताब्यात घेत येथील तहसील कार्यालयात आणण्यात आले आहेत.याठिकाणी दहा अनधिकृत रॅम्प आढळून आल्याने हे सर्व रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.