जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणांतर्गत कृषी यंत्रांचा लाभ घ्यावा ; आम.वैभव नाईक

276
2

मालवण, ता. ३१ : उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिम सन २०१९-२० अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यंत्र /औजारांचा पुरवठा अनुदानावर करण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरणाच्या  अनुदानाचा लाभ देण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे आमदार वैभव  नाईक यांनी केले आहे.
कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी यंत्र /औजारे उपलब्ध करून देण्यात येत असल्याबाबतची जाहिरात प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करून इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज मागवावेत व इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी २० दिवसांचा अवधी द्यावा असे निर्देश जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कृषी यांत्रिकीकरणांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, मोगडा, पल्टी नांगर, खत व बी टोकन यंत्र, मळणी यंत्र, भात लावणी यंत्र, पॉवर व्हीडर, रिपर, व रिपर कम बाईंडर, भात  मळणी यंत्र, मिनी भात मिल, ऊस पाचट कट्टी/ श्रेडर/ मल्चर, ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सबसॉइलर, ब्रश कटर आदी यंत्र /औजारांचा पुरवठा अनुदानावर करण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांचे अर्ज कृषि सहाय्यक/ कृषी पर्यवेक्षक/ मंडळ कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे स्वीकारले जाणार आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांना विनाविलंब संबंधित अर्जाची छाननी करून सोडत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.

4