वाहनचालकांना करावी लागतेय कसरत; ‘खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे’ वाहनचालकांची डोकेदुखी
वैभववाडी/पंकज मोरे
कुसूर गवळवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना यामार्गे प्रवास करणे डोकेदुखी बनली आहे. वैभववाडीला जाण्यासाठी वाहनचालक यामार्गाचा अवलंब करतात. परंतु, गेली कित्येक वर्षे या रस्त्याकडे संबंधित विभागाने पाठ फिरवल्याने या रस्त्याची दिवसेंदिवस चाळण होत चालली आहे. तरी या रस्त्याची लवकरच डागडुजी करावी अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांमधून केली जात आहे.
भुईबावडा ते कुसूर गवळवाडी मार्गे वैभववाडी १४ कि. मी. अंतर आहे. तर भुईबावडा उंबर्डे मार्गे वैभववाडी १८ कि. मी. चे अंतर आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक या मार्गाचा अवलंब करतात. हा रस्ता जि. प. च्या अखत्यारित असून गेली कित्येक वर्षे हा रस्ता दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र अद्यापही याकडे जि. प. बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या मार्गावरून दिवसभरात तीन ते चार फे-या एस.टी. बसच्या सुरू आहेत. सध्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने खाजगी वाहनेही या मार्गावरुन बंद आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना एस.टी.ची ताटकळत वाट पाहावी लागत आहे. तरी या रस्त्याची लवकरच डागडुजी करावी अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांमधून केली जात आहे.