पेंडुरच्या Beauties on Wheels चा संदेश : जागतिक सायकल दिन विशेष
सिंधुदुर्गनगरी, ता. २ : ३ जून हा दिन जगभर जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या भागातील नागरिकांना सायकल चालविण्याचे महत्व पटावे यासाठी दोन वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील पेंडुर येथील डॉ सोमनाथ परब यांनी Beauties on Wheels हा ग्रुप स्थापन केला. आज हि चळवळ जोमाने सुरु झाली आहे. ‘सायकल चालवा, आजार पळवा’ हा संदेश सर्वत्र पसरविण्यात त्यांना यश आले आहे.
‘सायकल चालवा’ हा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात अनेक ग्रुप कार्यरत आहेत. यात सावंतावाडीचा PAWS, कुडाळ सायकल ग्रुप, वेंगुर्लेचा वेंगा बॉईज, रांगणा मालवण ग्रुप, ओरोस-सुकळवाडचा Rainbow Riders या ग्रुपचा समावेश आहे. पेंडुर पंचक्रोशीसाठी डॉ सोमनाथ परब यांनी सुरु केलेल्या Beauties on Wheels या ग्रुपमध्ये नामांकित डॉक्टर सुद्धा सहभागी होत आहेत. सुमारे ३० सदस्य नियमित सायकल चालवितात. ग्रुपच्यावतीने जेष्ठ सायकल पटूंचा सत्कार, जेष्ठांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘सायकल फेरी’, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल मोहीम’ असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
या ग्रुपचे सदस्य दररोज १५ ते २० किमी सायकल चालवितात. गोळवण, तळगाव, वराड, धामापूर, मालवण, ओरोस, कुडाळ, कसाल असा प्रवास करतात.
नियमित सायकल चालविण्याने वजन कमी होते. जास्त काळ तरुण दिसता येते. चांगली झोप लागते. आरोग्य चांगले राहते. ब्रेन पॉवर वाढते. पोट कमी होते. रक्तदाब, मधुमेह कमी होतो. मानसिक आरोग्य लाभते. निसर्गाच्या सानिध्यात जाता येते. इंधन बचत होते. प्रदूषण कमी होण्यास मदत होते. स्नायू मजबूत होतात. रक्ताभिसरण चांगले होते, असे या ग्रुपचे सदस्य संजय नाईक यांनी सांगितले.