त्रिंबक बागवेवाडीतील घटना : भरवस्तीत बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट…
आचरा/ अर्जुन बापर्डेकर, ता. २ : भक्षाच्या शोधात असलेल्या एका बिबट्याने काल मध्यरात्री भरवस्तीत घुसून एका वासराचा फडशा पाडल्याची घटना तालुक्यातील त्रिंबक बागवेवाडी येथे घडली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी वनविभागाचे कर्मचारी त्रिंबक बागवेवाडी येथे दाखल झाले होते.
त्रिंबक बागवेवाडीतील हरी भाटकर यांच्या राहत्या घरासमोर नेहमीप्रमाणे गुरे बांधून ठेवली होती. काल मध्यरात्री भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याने गुरांमधील एका वासराला लक्ष्य करत त्याचा फडशा पाडला. पहाटे घराबाहेर आलेल्या भाटकर यांना दावणीला बांधलेले गाईचे वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती श्री. भाटकर यांनी त्रिंबक पोलिस पाटील बाबू सकपाळ यांना दिली. त्यानुसार श्री. सकपाळ यांनी वनविभागास याची माहिती देताच वनरक्षक विजय पांचाळ, वनमजूर अनिल परब हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करत पंचनामा केला. या घटनेची माहिती पंचायत समितीचे उपसभापती अशोक बागवे, पोलिस पाटील बाबू सकपाळ घटनास्थळी दाखल झाले होते.
त्रिंबक बागवेवाडीत घुसलेला बिबट्या हा ओहोळाकडून भरवस्तीत घुसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याच्या पंजाचे ठसेही ग्रामस्थांना वस्तीच्या दिशेने येत असल्याचे दिसून आले. पाण्यासाठी ओहोळाकडे आलेला बिबट्या भक्ष्यासाठी भरवस्तीत घुसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. बिबट्या वस्तीत घुसून दारात बांधलेल्या जनावरांची शिकार झाल्याची गेल्या पंचवीस वर्षातील पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याने भाटकर यांचे नुकसान झाले आहे. बिबट्या पुन्हा वस्तीत घुसण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी बंदिस्त गोठे बांधणे आवश्यक असून यासाठी शासनाने जास्तीत जास्त अनुदान द्यावे अशी मागणी शेतकर्यांमधून करण्यात येत आहे.