जिल्ह्यातील आशा वर्कर्स : गटप्रवर्तक कडाडल्या
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ : ‘वेतन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स यूनियनमधील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी ३ जून रोजी सकाळी ओरोस येथील शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी असा भव्य मोर्चा काढला. यामध्ये जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येने आशा, गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. ओरोस शिवाजी पुतळा येथून निघालेला मोर्चा डॉन बॉस्को मार्गे जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आला. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश जगताप यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासाठी निवेदन सादर करणार आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा. अभियानाचा निधी वाढवा. आशा व गटप्रवर्तक यांना कर्मचारी म्हणून सेवेत घ्या. आशाना १० हजार रूपये तर गटप्रवर्तक यांना १५ हजार रूपये असे किमान महिन्याला वेतन दया. शासकीय दवाखान्यांचे खाजगीकरण थांबवून आरोग्यसेवा मजबूत करा. लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या आशाना मोबादला व भत्ता दया. आशा, गटप्रवर्तक यांना दोन हजार रूपये दिवाळी भेट दया, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.