नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवकांचा इशारा
कणकवली, ता.३ : कणकवली शहरातील महामार्ग दुतर्फा ड्रेनेज लाईन पूर्ण झालेली नाही. स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेल्या नाहीत. चौपदरीकरणात येणाऱ्या पाइपलाइनची सफाईही करण्यात आलेली नाही. याखेरीज शहरातील अनेक कामे हायवे ठेकेदाराने अपूर्ण ठेवली आहेत. ही कामे येत्या दोन दिवसात पुर्ण न केल्यास गुरुवारपासून शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह सर्व सत्ताधिकारी नगरसेवकांनी आज दिला.
शहरातील पावसाळी कामाच्या नियोजनाची बैठक नगराध्यक्षांच्या दालनात झाली. यावेळी बांधकाम सभापती प्रतिक्षा सावंत, महिला व बालकल्याण सभापती उर्मी जाधव, बांधकाम सभापती संजय कामतेकर यांच्यासह विराज भोसले अभिजीत मुसळे महेंद्र सांब्रेकर तसेच नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात कणकवली शहरात महामार्ग ठेकेदाराने केलेल्या अपूर्ण कामांमुळे पाणी साठून राहण्याची शक्यता आहे. याबाबत ठेकेदाराला आणि महामार्ग विभागाला कळवून देखील कामे पूर्ण होत नाहीत. ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी तर फोन उचलणे बंद केले आहे. पावसाळ्यात पाणी निचरा न झाल्यास अनेक घरे दुकाने यांच्यामध्ये पाणी जाण्याचा धोका आहे. त्यामुळे हायवे विभागाने आणि महामार्ग प्राधिकरण यांनी येत्या दोन दिवसात शहरातील हायवे दुतर्फा असलेली कामे पूर्ण करावीत. अन्यथा गुरुवारपासून शहरात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम बंद पाडू असा इशारा नगराध्यक्ष आणि उपस्थित नगरसेवकांनी दिला.