सिंधुदुर्गनगरी, ता. ३ : केंद्र शासनाच्या २० सप्टेंबर २०१८ च्या मानधन वाढीच्या अधिसूचनेची महाराष्ट्र शासन अंमलबजावणी करत नाही ती करावी, इतर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे समकक्ष मानधन द्यावे, पेन्शन मिळावी आदि मागण्यांकडे वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. आपल्या मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने आज (सोमवार) पासून चार दिवस संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पोलीस मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. पहिल्या दिवशी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांशासनाचे लक्ष वेधन्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर चार दिवस धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परूळेकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी कुंदना कांबळे, प्रज्ञा जाधव, शोभा सावंत, स्मिता सावंत, विजय राणे, मीनल जाधव, शुभांगी भाईप, गुलाब चव्हाण, सत्वशीला गवस, सायली परब आदि अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.