हजारो भाविकांची उपस्थिती : १२ जूनला कवळासाने होणार सांगता
वेंगुर्ले, ता. ३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान, वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील‘‘नराचा नारायण‘‘ म्हणजेच माणसाचा देव श्री देव जैतिराच्या वार्षिक उत्सवाला आजपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.
‘जैतीर‘ हे तुळस गावचे प्रमुख दैवत असून त्याचा वार्षिक उत्सव वैशाख वद्य चतुदर्शीपासून ११ दिवस साजरा केला जातो. आज उत्सवाच्या प्रारंभी भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. दुपारपासून ढोल-ताशा, सनई,शिंगं या नानाविध वाद्यांच्या नादघोषात श्री जैतिर देवाने मांडावर खेळे केले. यावेळी या जैतिर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
मंदिर परिसरात विविध खेळणी, शेती उपयोगी तसेच गृहपयोगी वस्तू विक्रीसाठी आणल्याने परिसराला बाजारपेठेचे स्वरुप आले होते. पाऊस लांबणीवर असला तरी शेतक-यांनी शेतीसाठी लागणा-या नांगर, दाते, जू, गुटा, जगले, कोयती,कोयते, इशाडा, कामळा या वस्तूंची खरेदी केली.
ज्येष्ठ शुद्ध तृतीयेपासून ज्येष्ठ शुद्ध अष्टमीपर्यंत म्हणजेच सहा दिवस जैतिर देव संपूर्ण गावात भक्तांच्या घरी दर्शन देण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण तुळस गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ११ दिवस चालणा-या या उत्सवाची सांगता १२ जून रोजी कवळासाने होणार आहे.