चौघांना अटक: परस्पर विरोधी तक्रारी दाखल
सावंतवाडी, ता. 3 ः जमिनीच्या वादातून मळेवाड येथे दोन कुटुंबियात जोरदार वाद होवून गोविंद सावळ यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूने परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. ही घटना काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आज चौघांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी ः मळेवाड येथील काळोजी आणि सावळ या दोन कुटुंबियांमध्ये जमिनीच्या मालकीवरून वाद आहेत. काल जमिनीतून गेलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरून वाद झाले. यात श्रीपाद सावळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृष्णा काळोजी, निळकंठ काळोजी, अजित काळोजी, विष्णू काळोजी यांनी घरात येऊन आपल्याला तसेच आपले वडील गोविंद, भाऊ सद्गुरू यांना बेदम मारहाण केली व वडिलांच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. भावाच्या व आपल्या पाठिवर मारहाणीचे वार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर दुसरी तक्रार काळोजी कुटुंबियातील दोन महिलांनी केली आहे. त्यांनी सावळ कुटुंबियांच्या विरोधात आपल्याला अश्लिल शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबल करीत आहेत.