गोपाळ गवस : जिवीतहानी टाळण्यासाठी हत्ती हटाव मोहिम राबवा
दोडामार्ग, ता. 4 : तालुक्यात मोठ्या प्रमाणात हत्तींनी नुकसान करण्यास सुरवात केली आहे. लोकांच्या जिवीतास धोका आहे. त्यामुळे हत्ती हटाव मोहिमेबाबत तात्काळ भूमिका घ्या, अन्यथा वन अधिकार्यांना दोडामार्गात येऊ देणार नाही असा इशारा दोडामार्ग शिवसेनेचे उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी ब्रेकींग मालवणीला दिली.
ते म्हणाले, गेले काही दिवस दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतू अद्यापपर्यंत कोणतीही सकारात्मक भूमिका वनविभागाकडून घेण्यात आली नाही. वनअधिकारी समाधान चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तींनी केलेल्या नुकसान भरपाई पोटी आतापर्यंत 1 कोटी 4 लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. हेच पैसे हत्तींना हटविण्यात खर्च केले होते तर नुकसान आणि पुढील संभाव्य धोका टळला असता. परंतू वनअधिकार्यांची तशी मानसिकता दिसून येत नाही. गेले चार ते पाच दिवस आम्ही ग्रामस्थ हत्तींना रोखण्यासाठी वनकर्मचार्यांना सहकार्य करत आहोत. हत्ती सध्या आक्रमक आहेत. त्यांच्याकडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हत्ती हटाव मोहिमेबाबत तात्काळ शासनदरबारी प्रस्ताव पाठवा, अन्यथा वनअधिकार्यांच्या गाड्या रोखू असा इशारा त्यांनी दिला आहे.