डॉ. वजराटकर यांची बदली रद्द करा, अन्यथा आंदोलन

2

युवक काँग्रेसचा इशारा : सहापैकी तीन पदे रिक्त असल्याने नाराजी

वेंगुर्ले, ता. 4 : शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक वैद्यकिय अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथील सर्जन पांडूरंग वजराटकर यांची बदली रद्द करण्यात यावी, अन्यथा रास्ता रोको करू असा इशारा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा शिरोडा पंचायत समिती सदस्य सिद्धेश परब यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शिरोडा उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले, शिरोडा, मळेवाड, सातार्डा आदी भागातील लोकांना वरदान ठरलेले आहे. त्याठिकाणी सहा वैद्यकिय अधिकार्‍यांच्या जागा आहेत. त्यातील तीनच जागा भरलेल्या आहेत. दोन अधिकार्‍यांचे बॉण्ड संपल्याने त्यांना पुन्हा मुदत वाढवून देण्यात आली नाही. तर दुसरीकडे त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉ. वजराटकर यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बदली देण्यात आली आहे. परंतू ही बदली म्हणजे पंचक्रोशीतील लोकांवर अन्याय करणारी आहे. श्री. वजराटकर सोडले तर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात कोणीही सर्जन नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक प्रसंगी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी त्यांची बदली रद्द करून मुदत संपलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पुन्हा नियमित करून द्यावे, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

4