तंत्रशिक्षण संचालनालय व राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आयोजन
सावंतवाडी, ता. 4 : येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये तंत्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. 6 जून रोजी सकाळी दहा वाजता स्थगित तंत्रशिक्षण मेळाव्याचेे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाबद्दल जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शालेय शिक्षणाबरोबरच तंत्रशिक्षणाची जोड आवश्यक आहे. त्याचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तंत्रशिक्षणाची कास विद्यार्थ्यांनी धरल्यास त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा मेळावा होणार आहे.
तज्ञ मार्गदर्शकामार्फत संपूर्ण करिअर मार्गदर्शन, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया, नोकरी व स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शैक्षणिक कर्जाविषयी मार्गदर्शन, विविध शैक्षणिक संस्थांचे व वित्तीय संस्थांचे स्टॉल, प्रॉजेक्ट एक्झिबिशन असे या मेळाव्याचे स्वरुप असणार आहे तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे दहावी व बारावीनंतर उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता व प्रवेश प्रक्रिया, विविध शिष्यवृत्ती याबाबतचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या मेळाव्याला राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव भावेश कर्हाडे, सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे, प्रभारी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, बँक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक स्मिता सबनीस, भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी सहभागी होवून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई संचालक विनोद मोहितकर आणि भोसले पॉलिटेक्निकचे प्राचार्य गजानन भोसले यांच्याकडून करण्यात आले आहे.