वनशक्तीच्या अहवालात उघड: शासन काय भूमिका घेते याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष
सावंतवाडी ता.०५: मुंबई उच्च न्यायालयाचे बंदी आदेश धाब्यावर बसवून सावंतवाडी- दोडामार्ग तालुक्यातील तब्बल १६०० एकर क्षेत्रात बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.ही वृक्षतोड अति पर्यावरण संवेदनशील असलेल्या “सावंतवाडी-दोडामार्ग वाइल्डलाईफ कॉरिडॉर”मध्ये झाली असून,सध्या मुंबई उच्च न्यायालयाने येथे वृक्षतोडीस बंदी घातलेली आहे.
या कॉरिडॉरमध्ये २०१४ पासून सदरची बेसुमार वृक्षतोड झाली आहे.मुंबई येथील वनशक्ती या संस्थेने महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक बाब उघड झाली असून,वनविभागाचे पितळ उघडे पडले आहे.वनशक्तीने गुगल मॅपच्या साह्याने या परिसराचे सर्वेक्षण केले होते.
सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या राधानगरी अभयारण्याला कर्नाटकातील भीमगड अभयारण्याशी जोडणारा महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणून सावंतवाडी-दोडामार्ग वाइल्डलाईफ कॉरिडॉरची ओळख आहे.सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ते दोडामार्ग तालुक्यातील मांगेली पर्यंत पसरलेला,३५ किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्र असणारा हा कॉरिडॉर पट्टेरी वाघांचा भ्रमणमार्ग म्हणून ओळखला जातो.त्याशिवाय जंगली हत्ती,गवे व इतर शेड्युल १ मधील दुर्मिळ वन्यजीवांचे वास्तव या कॉरिडॉर मध्ये आहे.हा कॉरिडॉर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वनशक्ती व आवाज फौंडेशन या संस्थांनी जनहित याचिका दाखल केली आहे.त्यानुसार हा कॉरिडॉर इको सेन्सिटिव्ह झोन करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत.तसेच या परिसरात वृक्षतोड बंदीचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या कॉरिडॉर मधील तिलारी परिसरात वन्यजीव अभयारण्य उभारण्याचा प्रस्तावही वनविभागाने राज्यशासनास सादर केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर या परिसरात झालेली बेसुमार वृक्षतोड धक्कादायक ठरली आहे.२०१२ पासून या परिसरात वृक्षतोड बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी वनशक्ती व आवाज फौंडेशनच्या याचिकांवर निर्णय देताना वृक्षतोड बंदीचे पालन करण्याचे आदेश उपवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतचे शेवटचे आदेश ५ डिसेंबर २०१८ रोजी दिले होते.मात्र हे सर्व आदेश धाब्यावर बसवून वृक्षतोड सुरूच असल्याचे वनशक्ती या संस्थेने गुगल मॅपच्या साह्याने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.या परिसरातील जंगल क्षेत्राचा नाश शोधण्यासाठी वनशक्तीने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील प.घाट क्षेत्रातील ४८ गावांतील १०३ ठिकाणे निश्चित केली होती.२०१४ ते २०१८ या कालावधीत या १०३ ठिकाणांची स्थिती गुगल मॅपच्या साह्याने पाहण्यात आली असता, बेसुमार वृक्षतोडीचे विदारक चित्र समोर आले.सांगेली, आंबेगाव, सावरवाड,देवसु,केसरी,फणसवडे,केसरी,दाभिल,कोनशी, असनिये,फुकेरी,डेगवे, परमे,घोडगे,पणतूर्ली यांसह या दोन्ही तालुक्यातील ४८ गावांमधील १०३ ठिकाणी तब्बल १६०० एकर क्षेत्रात बेसुमार वृक्षतोड झाल्याचे दिसून आले आहे.वनशक्ती याबाबतचा अहवाल राज्यशासन व मुंबई उच्च न्यायालयास सादर केला आहे.या अहवालाने येथील वनविभागाचे पितळ उघडे पडले असून,इको सेन्सिटिव्ह झोनमधील ही वृक्षतोड वनविभागाच्या आशीर्वादामुळे झाली की दुर्लक्षामूळे,हा प्रश्न उपस्थित होत आहे.वनशक्तीच्या या अहवालावर मुंबई उच्च न्यायालय कोणता निर्णय घेणार तसेच राज्यशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.